ठाणे स्थायी समिती सभापतीपदासाठी  आज चुरशीची निवडणुक
* मनसेची भूमिका महत्वाची * राष्ट्रवादीचा गुगलीने शिवसेना अडचणीत * दोन्ही बाजूंचे संख्याबळ समान
राष्ट्रवादी काँग्रेसला वाकुल्या दाखवत शिवसेनेशी संग बांधू पाहणाऱ्या काँग्रेसच्या गळ्यात स्थायी समिती सभापतीपदाची उमेदवारी बांधून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खेळलेल्या तिरक्या चालीमुळे मंगळवारी होणाऱ्या ठाणे महापालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत रंग भरू लागले असून युती आणि आघाडी अशा दोन्ही बाजूंचे संख्याबळ कागदावर आठ-आठ असे दिसत असल्याने घटस्थापनेच्या दिवशी देवीचा कौल कुणाला, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
ठाण्यात आघाडी-युतीच्या न्यायालयीन लढाईत गेल्या आठ महिन्यांपासून स्थायी समितीची स्थापनाच झालेली नाही. राष्ट्रवादीने स्थापन केलेल्या लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून काँग्रेस पक्षाची धडपड सुरू आहे. महापौर निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने स्थापन केलेल्या लोकशाही आघाडी गटात काँग्रेस तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवकही सहभागी झाले. यामुळे काँग्रेसच्या १८ नगरसेवकांना लोकशाही आघाडीचा व्हिप बंधनकारक झाला. मात्र, लोकशाही आघाडीचा आदेश मान्य नाही, अशी भूमिका घेत काँग्रेसने शिवसेनेसोबत संग बांधण्याचा प्रयत्न केला. यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या ठिकाणी काँग्रेसला चपराक लगावत लोकशाही आघाडी गटात राहणे बंधनकारक असल्याचा निर्णय मध्यंतरी उच्च न्यायालयाने दिला. असे असताना उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत काँग्रेसने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या न्यायालयीन प्रक्रियेमुळे ठाणे महापालिकेचा आर्थिक गाडा अडला असताना प्रत्यक्ष निवडणूक लागताच काँग्रेसने घुमजाव करत राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवारी होणारी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक चुरशीची झाली आहे. स्थायी समितीमध्ये बहुजन समाजवादी पक्षासह युतीचे आठ नगरसेवक आहेत, तर राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे आघाडीचे आठ नगरसेवक आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंचे संख्याबळ समसमान झाल्यास चिठ्ठय़ा टाकून सभापती निवडला जाईल, असे चित्र आहे. आघाडीतील समझोत्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव सदस्य असलेले सुधाकर चव्हाण यांना सभापतीपदाची उमेदवारी देण्याचा निर्णय आघाडीच्या गोटात पक्का झाला होता. मात्र, काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत संग करत आहेत हे लक्षात येताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शुक्रवारी सभापतीपदाची उमेदवारी काँग्रेसच्या गळ्यात मारून तिरकी चाल खेळली आहे. हा फॉम्र्युला अमलात आणताना मनसेचे सुधाकर चव्हाण यांची हरकत होती, अशी चर्चा आहे. मात्र, चव्हाण यांची समजूत घालण्यात राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांना यश आल्याचे बोलले जाते. दरम्यान, सभापतीपदासाठी शिवसेना-भाजप-बसप युतीचे उमेदवार विलास कांबळे आणि काँग्रेसचे रवींद्र फाटक यांचा थेट सामना होत असून राष्ट्रवादीचे कळव्यातील नगरसेवक गणेश साळवी यांची भूमिकाही या निवडणुकीत महत्त्वाची ठरण्याची चिन्हे आहेत.