महापालिका स्थायी समिती सभापतीपदी मनसे-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे शिवाजी चुंभळे यांनी भाजप-सेना-रिपाइं महायुतीच्या ललिता भालेराव यांना पराभूत करत पालिका तिजोरीच्या चाव्या आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले. सत्ताधारी आघाडीकडे बहुमत असल्याने सेना-भाजपने आपला उमेदवार पुढे न करता रिपाइंला या लढाईसाठी मैदानात उतरविले. चुंभळे यांना ११ तर भालेराव यांना पाच मते मिळाली. स्थायी समितीच्या या निकालामुळे नाशिक शहरासह जिल्ह्याच्या आर्थिक नाडय़ा चुंभळे कुटुंबियांकडे एकवटल्याचे अधोरेखीत झाले आहे. जिल्हा परिषदेत शिवाजी चुंभळे यांची सून विजयश्री चुंभळे विद्यमान अध्यक्ष आहे. अध्यक्ष हेच जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिध्द अध्यक्ष असतात. ग्रामीण भागातील तिजोरीची आर्थिक चावी त्यांच्याकडे असताना आता शहरातील तिजोरीच्या चाव्याही या कुटुंबाकडे गेल्या आहेत.
स्थायी सभापती निवडणुकीची प्रक्रिया मंगळवारी झाली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिकेच्या सभोवतालच्या रस्त्यांवरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. राजकीय पक्षांनी सदस्यांची पळवापळवी होऊ नये अथवा कोणताही दगाफटका टाळण्यासाठी चांगलीच खबरदारी घेतली होती. सभापतीपदाचे उमेदवार राष्ट्रवादीचे शिवाजी चुंभळे, शिवसेना-रिपाईच्या ललिता भालेराव, भाजपचे कुणाल वाघ आणि काँग्रेसचे राहुल दिवे यांचे अर्ज होते. स्थायी समितीत मनसेचे पाच, राष्ट्रवादीचे तीन, शिवसेना-रिपाई तीन, काँग्रेस व भाजपचे प्रत्येकी दोन आणि एक अपक्ष असे संख्याबळ आहे. मनसेने राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचे जाहीर केले असल्याने ही लढत एकतर्फी होणार होती. उमेदवार माघारीच्या मुदतीत काँग्रेसचे दिवे आणि भाजपच्या वाघ यांनी आपले अर्ज मागे घेतले. हात उंचावून झालेल्या मतदानात चुंभळे यांना ११ तर भालेराव यांना पाच मते मिळाली. या निवडणुकीत सेना, भाजप एकाकी पडल्याचे पहावयास मिळाले.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चुंभळे विजयी झाल्याचे जाहीर केल्यावर महापालिका प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. महापौर अशोक मुर्तडक यांनी चुंभळे यांचे अभिनंदन केले. स्थायी सभापतीपद राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झाला आहे. यामुळे याबद्दल मतप्रदर्शन करणे योग्य नसल्याचे मुर्तडक यांनी सांगून भाष्य करण्यास नकार दिला.
चुंभळे यांनी आगामी सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, महापालिकेकडून भाविकांच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक चांगल्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची ग्वाही दिली. काँग्रेसने भाजपला पाठिंबा देण्याच्या बदल्यात दोन प्रभाग समित्यांचा शब्द आपल्या पदरात पाडून घेतल्याचे सांगितले जाते.
मनसेने उमेदवार न देता राष्ट्रवादीच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे पहावयास मिळाले.