शिवसेनेचे नगसेवक विठ्ठल मोरे यांनी नवी मुंबई पालिकेचे आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांना अपशब्द वापरल्याने सर्व अधिकाऱ्यांनी स्थायी, प्रभाग आणि सर्वसाधारण सभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा पहिला फटका गुरुवारी झालेल्या स्थायी समितीला बसला असून, सभेत एक सौरऊर्जेची निविदा नामंजूर करून सभा गुंडाळण्यात आली. शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेवरदेखील या अधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे. जोपर्यंत मोरे आयुक्तांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत हा बहिष्कार सुरू राहणार असल्याचे पालिका अधिकारी आसोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
स्थायी समितीच्या मागील सभेत मोरे यांनी आमच्या प्रभागातील कामे मंजूर करताना आयुक्तांच्या हाताला लकवा मारतो काय, असा सवाल केला होता. त्यामुळे पालिकेतील अधिकारी वर्ग नाराज झाला आहे. आयुक्त जऱ्हाड यांनीही आमच्या मनगटात अद्याप ताकद आहे, असे उत्तर देऊन संघर्षांची ठिणगी टाकली. मोरे यांच्या या वक्तव्यानंतर गुरुवारी अधिकारी असोशिएशनने सर्व सभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचा पहिला फटका स्थायी समितीला बसला. स्थायी समितीत गुरुवारी आलेले इतर सर्व प्रस्ताव दप्तरी दाखल करून घेण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी पालिकेने मोरबे धरणावर सौरऊर्जा तयार करण्याचे १८९ कोटी खर्चाचे कंत्राट एका कंपनीला दिले होते. त्याने वेळेत सुरक्षा अनामत रक्कम न भरल्याने त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले.