महापालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांमधून आठ सदस्यांना निवृत्ती देण्यात आली आहे. याशिवाय काही सदस्यांकडून राजीनामे घेण्याची तयारी वेगवेगळ्या गटांनी सुरू केली आहे. त्यामुळे रिक्त पदे वाढण्याची शक्यता आहे. १८ फेब्रुवारीला होणाऱ्या महापालिकेच्या महासभेत स्थायी समितीच्या नव्या सदस्यांची नियुक्त होणार असून त्यासाठी वरिष्ठ नेत्यांची मनधरणी सुरू झाली आहे.
महापालिकेच्या नव्या कायद्यानुसार ५ फेब्रुवारीला स्थायी समितीच्या बैठकीत सीमा राऊत, भावना लोणारे, मोहंमद खान, माया इवनाते, देवेंद्र मेहर, मीना चौधरी, राहुल तेलंग आणि पुरुषोत्तम हजारे या आठ सदस्यांना यापूर्वीच सदस्यपदाचे राजीनामे दिले आहेत. उर्वरित आठ सदस्यांना कायद्यानुसार दोन वर्ष समितीवर राहण्याची मुभा आहे. परंतु अधिकाधिक सदस्यांना समितीवर संधी मिळावी, असा पक्ष आणि वेगवेगळ्या गटांचा प्रयत्न आहे. १८ फेब्रुवारीला होणाऱ्या महासभेपूर्वी सदस्यांचे राजीनामे महापौरांकडे पाठवून मंजूर करवून घेतले जाऊ शकतात. यामुळे महासभेत आठपेक्षा जास्त सदस्यांची नियुक्ती होणार हे मानले जात आहे. तथापि काही राजीनामे महापौरांकडे पाठविले जाऊ नये यादृष्टीने हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. गटनेत्यांकडून बंद लखोटय़ात येणाऱ्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल. लोकसभा, त्यानंतर विधानसभा आणि विधानसभेनंतर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. त्यामुळे सहा महिन्याच्यावर आचारसंहिता राहण्याची शक्यता आहे. फारच कमी काळ संधी मिळणार असल्यामुळे अनेक नगरसेवक समितीवर जाण्यास इच्छुक नसल्याची माहिती मिळाली.
स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत असताना अध्यक्षपद कोणाकडे जाईल की ठाकरे यांच्याकडे पुन्हा येईल अशी चर्चा आता रंगू लागली आहे. लोकसभा निवडणुका बघता अध्यक्षपद हे पूर्व विभागाकडे असावे असे यावेळी प्रयत्न आहे. पक्षातील इच्छुक सदस्यांनी आपल्या ‘गॉडफादर’च्या माध्यमातून लॉबिंग सुरू केली आहे. पक्षाकडून काही सदस्यांना स्थायी समितीची ऑफर दिली आहे. एकदा स्थायी समितीवर निवड झाली तर दुसऱ्यांदा संधी मिळणार नाही. त्यामुळे अध्यक्षपदाची हमी मिळत असेल तर स्थायी समितीवर पाठवा अशी भूमिका भाजपच्या काही नगरसेवकांनी घेतली असल्याची माहिती सूत्राकडून कळते. बाल्या बोरकर, रमेश सिंगारे, चेतना टांक यांची नावे सध्या अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे.