सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भात १० एपिलला मतदान होणार असल्याने विविध राजकीय पक्षांतील उमेदवारांच्या प्रचाराला आता वेग आला आहे. विविध पक्षांच्या प्रचारासाठी विदर्भातील विविध जिल्ह्य़ात उद्या गुरुवार, २७ मार्चपासून स्टार प्रचारकांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. येत्या दहा दिवसात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, बसपाच्या अध्यक्ष मायावती, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहाण, शहनवाज हुसैन, छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह, अभिनेते विवेक ओबेराय आदी स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधान पदाचे दावेदार असलेले नरेंद्र मोदी यांची नुकतीच वध्र्यामध्ये जाहीर सभा झाली. अकोलामध्ये संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी त्यांची ३० मार्चला जाहीर सभा होणार आहे. शिवाय विदर्भात गोंदिया- भंडारा मतदार संघात त्यांची प्रचार सभा आयोजित करण्यात येणार असून त्याबाबतचा निर्णय झालेला नाही. नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी माजी आंतरराष्ट्रीय क्रिक्रेटर नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नागपुरात तीन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. २८ मार्चला अभिनेत्री प्रिती िझगयानी तर २९ मार्चला अभिनेत्री दिव्या दत्ता यांच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. १ एप्रिलला अभिनेत्री आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या हेमामालिनी उपराजधानीत जयताळा, वैष्णोदेवी चौक व झिंगाबाई टाकळी या ठिकाणी तर २ एप्रिल अभिनेत्री स्मृती इराणी यांच्या नागपुरात तीन सभा होणार आहे. ४ एप्रिलला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शहनवाज हुसेन यांच्या तीन सभा होणार आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांच्या पूर्व आणि उत्तर नागपुरात जाहीर सभा होईल. अभिनेते विवेक ओबेराय यांचा ६ एप्रिला नागपुरात रोड शो होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची यवतमाळमध्ये सभा होणार आहे.
बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची अमरावतीला २७ मार्च सायन्सकोर मैदानावर जाहीर सभा होणार आहे. मायावती यांची विदर्भात ही एकमेव सभा असल्याची माहिती पक्षाच्या नेत्यांनी दिली. वध्र्यामध्ये नरेंद्र मोदी यांची जंगी जाहीर सभा झाल्यानंतर २८ मार्चला काँग्रेसचे उमेदवार सागर मेघे यांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे.
५ मार्चला पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची जाहीर सभा आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे मात्र अजून त्यांचा निश्चित कार्यक्रम आला नसल्याचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितले. काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते विदर्भात अकोला, यवतमाळ, नागपूर मतदार संघात प्रचार सभा घेणार आहेत.
याशिवाय भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे आदी नेते विदर्भातील विविध जिल्ह्य़ात प्रचार सभा घेणार आहेत. स्टार प्रचारकांच्या या दौऱ्यामुळे विदर्भात आरोप प्रत्यारोपासोबत निवडणुकीत रंगत येणार आहे.