पारंपरिक शिक्षण पद्धती आजच्या काळाशी सुसंगत राहिली नसल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. नव्या तंत्रज्ञानावर आधारित युगात या तंत्राची परिपूर्ण माहिती असलेल्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. असे मनुष्यबळ निर्माण करण्यास विद्यापीठांनी पुढाकार घेतला असून उद्योगांची साथ मिळाल्यास क्लास रूमच्या बाहेर, प्रत्यक्ष कारखान्यांत, प्रयोगशाळांमध्ये काम केलेल्या तंत्रज्ञांची मोठी फळीच उद्योगांना उपलब्ध होईल. त्याचा उद्योगांबरोबरच देशालाही मोठा फायदा होऊ शकेल, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी केले.
इंडियन पल्प अॅण्ड पेपर टेक्निकल असोसिएशन (इप्टा) यांच्यातर्फे आयोजित ‘कागदाचा पुनर्वापर, उच्च दर्जाचे उत्पादन आणि ऊर्जा बचत’ या विषयावरील विभागीय परिषद, चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. पांढरीपांडे बोलत होते. आयपीपीटीएचे अध्यक्ष संजय सिंग, उपाध्यक्ष निहार अग्रवाल, संयोजक शेखर देसरडा, गर्ग व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. पांढरीपांडे म्हणाले, की कितीही संगणकीकरण झाले असले, तरी कागदाचा वापर कमी झालेला नाही. संगणकाबरोबर आम्हाला प्रिंटर लागतो. प्लास्टिक मनीबरोबर कागदी नोटाही हव्या असतात. कागदाचा पुनर्वापर, तसेच उच्च दर्जाचे उत्पादन आणि पर्यावरण व ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात खूप काम करता येण्याजोगे आहे. हे सारे समाज व देशहिताचेच आहे. या दृष्टीने उद्योगांनी विद्यापीठांना मदत करावी आणि विद्यापीठांनी उद्योगांच्या मदतीने कुशल मनुष्यबळाची निर्मिती करावी. यावर गांभीर्यपूर्वक विचार व्हावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक शेखर देसरडा व सूत्रसंचालन सुधीर मोघे यांनी केले.