शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची कोंडी लक्षात घेता जालना रस्त्यावरून वळणरस्ता आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने १ कोटी ८६ लाख रुपयांच्या वळण रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. शहराच्या सर्वागीण विकासासाठी अनेक कामे प्रस्तावित असून, येत्या काही दिवसांत त्यास मंजुरी मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.
शहरातील शाहूनगर ते रिलायन्स पेट्रोल पंप बाहय़वळण रस्ताकामाचा प्रारंभ क्षीरसागर यांच्या हस्ते झाला. आमदार बदामराव पंडित, माजी आमदार सय्यद सलीम, जनार्दन तुपे, राजेंद्र जगताप, डॉ. भारतभूषण क्षीरसागर आदी उपस्थित होते. पालकमंत्री क्षीरसागर म्हणाले, की, शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस वाहनांची गदी वाढत आहे. जड वाहनांच्या या गर्दीमुळे अनेक अपघात झाले. अपघात टाळण्यासाठी व शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी हा बाहय़वळण रस्ता तयार करण्यात येत आहे. याचे काम जलद व दर्जेदार करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. येडशी ते औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे.
नगरपरिषदेने पाणीपुरवठय़ासाठी केलेल्या पूर्वनियोजनामुळे टंचाई स्थितीतही बीड शहरात अजून तरी नागरिकांना पाण्याचा व्यवस्थित पुरवठा केला जात आहे. शहरालगतची वाढती लोकवस्ती लक्षात घेता शहरात पाण्याच्या टाक्या बांधकामासाठी नियोजन केले जात आहे. शहरातील मजुरांसाठी सुवर्णजयंती शहरी रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. जिल्हय़ातील पर्यटन स्थळे, तीर्थक्षेत्र विकास निकषाप्रमाणे ब व क वर्गात समाविष्ट करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रस्ताव सरकारकडे सादर झाले आहेत. त्याला लवकरच मंजुरी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.