* बोकडविरा चारफाटा ते कोटनाका एकेरी वाहतूक         
*  रिक्षाचालकांचा मात्र विरोध
उरण शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय योजना करण्याची मागणी उरणच्या जनतेकडून सातत्याने केली जात होती. याची दखल घेत उरण वाहतूक विभागाने मंगळवारपासून प्रायोगिक तत्त्वावर उरण-पनवेल रस्त्यावरील बोकडविरा चार फाटा ते कोटनाका उरण या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू केली आहे. या एकेरी मार्गामुळे येथील रिक्षाचालकांना पाच किलोमीटरचे अंतर वाढत असल्याने प्रवासी जादा भाडे न देता एसटी किंवा एनएमएमटीला जातील व आपले नुकसान होईल, अशी भूमिका घेत रिक्षाचालकांनी चारफाटा येथे एकत्रित येत वाहतूक पोलिसांच्या या निर्णयाचा विरोध केला. रिक्षासाठी बोकडविरा चारफाटा ते कोटनाका रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी सुरू करण्याची मागणी केली आहे.
राज्यातील इतर शहरांप्रमाणेच उरण शहरातही वाहतूक कोंडीची समस्या आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकही जबाबदार असून, नियमांचे उल्लंघन करीत रस्त्यावर वाहने उभी करणे आदी कारणेही त्याला जबाबदार आहेत. उरण शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उरण शहराला बायपास रस्ता काढावा याकरिता सिडकोकडून मंजुरीही देण्यात आली आहे.
मात्र त्याचे काम सुरू न झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिकच गहण बनली आहे. यावर उपाय योजना म्हणून वाहतूक विभागाने उरण शहरात जाण्यासाठी बोकडविरा चारफाटा मार्गे एकेरी मार्ग सुरू केला आहे.
यामध्ये दुचाकी वाहनांना मात्र सूट देण्यात आलेली आहे. वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य केल्यास वाहतूक कोंडीवर तात्पुरता का होईना तोडगा निघू शकतो, तसेच रिक्षाचालकांच्या समस्येसंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे मत उरण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम धुंदळे यांनी व्यक्त केले आहे.