सुंदर मुलगी दिसली की तिच्याकडे आधाशासारखे पाहत राहणे हे टोळक्यांचे आवडतेच काम. रस्त्यावर चालताना, बस, रेल्वेतून प्रवास करताना, हॉटेल, कार्यालयात असे अनुभव मुलींना नेहमीच येत असतात. अशाच काही प्रसंगांवर आधारित अवघ्या ९० सेकंदांच्या एका व्हिडिओने सध्या ‘यू टय़ूब’वर धमाल उडवली आहे. एका आठवडय़ात या व्हिडिओला तब्बल २३ लाख ८६ हजार ७३७ व्ह्यू मिळाले आहेत. तर १०,०६२ लाइक्स आणि १,१७३ डिसलाइक मिळाले आहेत.
दिल्लीतील निर्भया बलात्काराच्या पाश्र्वभूमीवर ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल’ने हा व्हिडिओ तयार केला आहे. त्याचे दिग्दर्शन याच संस्थेचा माजी विद्यार्थी केतन राणा याने केले आहे. मुलींकडे वाईट नजरेने पाहू नका, असा संदेश त्याला द्यायचा आहे.
हा व्हिडिओ मागच्या आठवडय़ात यू टय़ूबवर अपलोड करण्यात आला. बघताबघता तो अतोनात लोकप्रिय झाला. या व्हिडिओला मिळणारा प्रतिसाद अनपेक्षित असल्याचे केतन सांगतो.
एखादी कथा दिग्दर्शकाचा शोध घेत येते, असा प्रसंग दिग्दर्शकाच्या आयुष्यात खूप कमी येतो. या व्हिडिओमधील कथा अशाच प्रकारची आहे, असे केतन सांगतो. हा व्हिडिओ छायाचित्रकार किरण देहांस, संगीत दिग्दर्शक राम संपत, वेषभूषाकार निता लुल्ला आदींच्या सहकार्याने तयार करण्यात आलेला आहे.