क्रेडिट कार्डद्वारे झालेल्या फसवणुकीस सेवेतील निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत बँकेला ग्राहक न्यायालयात खेचणाऱ्या पुण्याच्या रहिवाशाला दिलासा देण्यास राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाने नकार दिला. लूट झालेली रक्कम बँकेने परत करावी, ही ग्राहकाची मागणीही आयोगाने फेटाळून लावली. ग्राहकाच्या क्रेडिट कार्डचा ‘सिक्रेट पासवर्ड’ माहीत असलेल्या व्यक्तीनेच ही फसवणूक केली असून त्यासाठी बँकेला जबाबदार ठरविणे उचित नाही, असे आयोगाने निकालात स्पष्ट केले.
पुणे येथील बलकट्टा हेगडे यांनी क्रेडिट कार्ड फसवणुकीसाठी बँक जबाबदार असल्याचा दावा करीत ‘आयसीआयसीआय’ बँकेविरोधात सुरुवातीला पुणे ग्राहक न्यायालयाकडे तक्रार केली होती. हेगडे यांच्या तक्रारीनुसार, १४ ऑक्टोबर २००९ रोजी बँकेने ‘एसएमएस’ सेवेद्वारे हेगडे यांना त्यांच्या खात्यातून क्रेडिट कार्डद्वारे ३४,५२९ रुपये काढण्यात आल्याचे कळविले. विमानाच्या तिकीट खरेदीसाठी हे पैसे काढण्यात आल्याचे आणि ती रक्कम ‘इझीगो वन अॅण्ड टूर्स’ या कंपनीला देण्यात आल्याचेही बँकेने हेगडे यांना कळविले.
मात्र क्रेडिट कार्डद्वारे आपण पैसे काढलेच नसल्याचा दावा करीत आपल्या खात्यातून क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढल्याची नोंद रद्द करण्याचे तसेच हा फसवणुकीचा गुन्हा असून लुटली गेलेली रक्कम आपल्याला परत करण्याचे आदेश बँकेला देण्याची मागणी हेगडे यांनी ग्राहक न्यायालयाकडे केली. शिवाय फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आपण लगेचच बँकेला त्याबाबत कळविले होते. परंतु त्यानंतरही बँकेकडून काहीही कारवाई करण्यात आली नाही, असा दावा हेगडे यांनी केला होता. बँकेने मात्र आपली बाजू मांडताना, हेगडे यांच्या क्रेडिट कार्डचा ‘सिक्रेट पासवर्ड’ हा केवळ त्यांनाच ठाऊक असणे गृहित धरण्यात आले आहे, असा युक्तिवाद केला. तसेच हेगडे यांचे क्रेडिट कार्ड थ्रीडी सिक्युरिटीयुक्त असून त्याच्याशी बँकेचा काही संबंध नाही, हेही बँकेने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ऑनलाईन व्यवहार करणे सुरक्षित असावे म्हणून थ्रीडी सुरक्षा घेतली जाते. हेगडे यांनी ही सेवा आपल्या क्रेडिट कार्डसाठी घेतली होती. त्याचा बँकेशी काहीही संबंध नाही हे बँकेचे म्हणणे मान्य करीत ग्राहक न्यायालयाने हेगडे यांची तक्रार फेटाळून लावली. त्यामुळे हेगडे यांनी त्या विरोधात आयोगाकडे धाव घेतली. परंतु आयोगानेही ग्राहक न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करीत हेगडे यांनी घटनेनंतर लगेचच सायबर गुन्हे विभागाकडे क्रेडिट कार्ड फसवणुकीची तक्रार करायला हवी होती, असे नमूद करीत त्यांची तक्रार फेटाळून लावली.