महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे थकबाकीदार कर्जदारांना दिलासा देण्यासाठी ‘राज्य बँक अनुत्पादित वर्गवारीमधील कर्जासाठी सामोपचार परतफेड योजना-२०१२’ संमत करण्यात आली असून या योजनेव्दारे थकीत कर्जदारांच्या पुस्तकी येणे बाकी व व्याज यामध्ये धोरणातील वर्गवारीनुसार राज्य बँक सूट देणार आहे. राज्य सहकारी बँकेच्या ८ डिसेंबर रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सदर योजनेस बहुमताने मंजुरी देण्यात आली. शासकीय थकहमी असलेली कर्जे वगळता अन्य सर्व प्रकारच्या कर्जास या योजनेव्दारे कर्जदारास सवलत मिळून दिलासा मिळणार आहे.
नाबार्डच्या धोरणानुसार शासकीय थकहमी असलेल्या कर्जास अशी सवलत देता येत नसल्यामुळे सदर कर्जे या योजनेमध्ये समाविष्ट करता आलेली नाहीत, असे स्पष्टीकरण राज्य बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार अग्रवाल यांनी उपस्थित सभासदांना विशेष सर्वसाधारण सभेमध्ये केले. सदर योजनेचा लाभ ३१ जानेवारी २०१३ पूर्वी घेण्याचा असल्याने संबंधित थकबाकीदार कर्जदार सभासदांनी या सामोपचार परतफेड योजनेसाठी नजीकच्या कार्यालयात त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.