विदर्भातील विपुल वनसंपदा, वन्यजीवांची संख्या आणि पर्यटनस्थळांची समृद्धता पाहता वन्यजीव, वने, पर्यटन हे आर्थिक विकासाचे नवे मॉडेल तयार होऊ शकते. मात्र, कालपरवाच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात त्याला चालना देणाऱ्या एकाही घटकासाठी राज्याने आर्थिक निधीची तरतूद केली नाही. त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीच्या माध्यमातून आर्थिक विकासाचा स्रोत समोर असतानासुद्धा विदर्भाच्या विकासात अडसर निर्माण करण्याचे काम राज्य सरकारने केल्याची प्रतिक्रिया विविध क्षेत्रातून उमटत आहे.
राज्यातील एकूण पाच व्याघ्र प्रकल्पांपैकी चार व्याघ्र प्रकल्प एकटय़ा विदर्भात आहे, तर पाचवा व्याघ्र प्रकल्प अधिसूचनेच्या वाटेवर आहे. अलीकडे जंगल पर्यटनाकडे वाढलेला लोकांचा कल बघता या व्याघ्र प्रकल्पांच्या विकासासाठी काहीतरी हाती येईल, असे वाटले होते. मेळघाटात वाघांचे दर्शन दुर्लभ असले तरीही निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांचे होणारे सहज दर्शन यामुळे परदेशी पर्यटकाला त्याने आकृष्ट केले आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि इतर वन्यजीवांचे दर्शन तसेच निसर्ग असा अनोखा मेळ साधला गेला आहे. तर नागझिरा-नवेगाव या नव्या व्याघ्र प्रकल्पातसुद्धा अशीच स्थिती आहे.
अधिसूचनेच्या वाटेवर असलेला बोर हा व्याघ्र प्रकल्पसुद्धा पर्यटकांना अलीकडे व्याघ्रदर्शन घडवत आहे. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पांच्या वाटय़ाला काही ना काही तरी येईल, अशी खात्री वन्यजीवप्रेमींना होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली.
मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच आणि नागझिरा-नवेगाव तसेच अधिसूचनेच्या प्रतीक्षेत असलेला बोर या व्याघ्र प्रकल्पात जाण्यासाठी बाहेरून येणाऱ्या पर्यटकाला आधी नागपुरातच प्रवेश करावा लागतो. तसेच मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यातील व्याघ्र प्रकल्पात प्रवेशासाठीसुद्धा पर्यटकांना नागपुरात येण्यावाचून पर्याय नाही. नागपूरच्या चौफेर असणाऱ्या व्याघ्र प्रकल्पामुळे नागपूरला ‘वाघांची राजधानी’ म्हणून घोषित करण्याची मागणी आहे. याच नागपुरात आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे विदेशी पर्यटक अवघ्या दोन ते चार दिवसांच्या दौऱ्यात व्याघ्रप्रकल्पात भ्रमंती करू शकतात.
या व्याघ्र प्रकल्पांच्या जोडीलाच अनेक निसर्गरम्य पर्यटनस्थळे याठिकाणी आहेत. मध्यभारतातील सीएसी ऑलराऊंडर ही एकमेव साहस प्रशिक्षण देणारी आणि पर्यटकांना साहसी कलाकृतीचा आनंद देणारी संस्था रामटेकजवळ आहे. जोडीलाच रामटेक, खिंडसी, रामधाम, मनसर यासारखी पर्यटनस्थळे आहे.
अनेक चांगली पण दुर्लक्षित पर्यटनस्थळे विदर्भात आहेत. या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी राज्य सरकारने या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करणे अपेक्षित होते.