महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे ३३ वे राज्यस्तरीय अधिवेशन दि. २ व ३ फेब्रुवारी रोजी कमला कॉलेज येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाचे आयोजन शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशनने केले आहे. या अधिवेशनास राज्यभरातून ८०० प्राचार्य उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्राचार्य असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.क्रांतीकुमार पाटील यांनी यावेळी दिली.    
सध्या उच्च शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. पारंपरिक विद्यापीठाच्या जोडीला अभिमत विद्यापीठे, खासगी व परदेशी विद्यापीठांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांसमोर नवी आव्हाने उभी आहेत. ती सोडविण्यासाठी या अधिवेशनामध्ये तज्ज्ञांकडून उद्बोधन होणार आहे.     
दि.२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या दोन दिवसीय अधिवेशनाच्या विविध सत्रांमध्ये शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये डॉ.एन.डी.पाटील, रा.कृ.कणबरकर, डॉ.पी.बी.पाटील, डॉ.एन.जे.पवार, डॉ.विजय खोले, डॉ.विवेक सावंत, डॉ.जी.श्रीनिवास यांचा समावेश आहे. रविवारी, ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता समारोपाचे सत्र असून या सत्रामध्ये ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील प्रमुख पाहुणे म्हणून विचार मांडणार आहेत. अध्यक्षस्थानी प्राचार्य रा.कृ.कणबरकर हे असणार आहेत.    
राज्य पातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या या अधिवेशनामध्ये प्राचार्याना विविध प्रश्न मांडण्यासाठी व त्यांच्यावरील उपाययोजनेबाबत मौलिक मार्गदर्शन होण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन उपयुक्त ठरणार आहे. तरी या अधिवेशनास राज्यातील प्राचार्यानी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ.क्रांतीकुमार पाटील यांनी केले आहे.