राज्य सरकारचे२०१२-१३साठीचे उत्कृष्ट मराठी वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून ३१ साहित्यिकांचा यात समावेश आहे. मराठवाडय़ातील साहित्यिक बाबा भांड, हृषीकेश कांबळे, इंद्रजित भालेराव, अभय दाणी व अतुल देऊळगावकर यांचा यात समावेश आहे.
भांड यांच्या ‘लोकपाळ राजा सयाजीराव’ या ग्रंथाला चरित्रग्रंथासाठी न. चिं. केळकर पुरस्कार, कांबळे यांच्या ‘दलित कविता आणि अमेरिकन ब्लॅक पोएट्री’ या समीक्षाग्रंथाला श्री. के. क्षीरसागर पुरस्कार, भालेराव यांच्या ‘गावाकडं’ या कवितासंग्रहाला बालकवी पुरस्कार, दाणी यांच्या ‘एरवी हा जाळ’ या काव्यसंग्रहाला बहिणाबाई चौधरी पुरस्कार, तर देऊळगावकर यांच्या ‘विश्वाचे आर्त’ला डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार जाहीर झाला.
भांड, कांबळे आणि देऊळगावकर यांच्या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी एक लाख रुपये, तर दाणी व भालेराव यांच्या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी ५० हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. येत्या २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मुंबईत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.