येवला तालुका वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता नवोदितांचे १३वे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी राज्यस्तरीय लोकमान्य टिळक गौरव पुरस्कारांचेही वितरण केले जाणार आहे.
येवला-मनमाड रस्त्यावरील कन्यादान लॉन्समध्ये होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अ‍ॅड. माणिकराव शिंदे पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती डॉ. प्रसादशास्त्री कुलकर्णी यांनी दिली. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य, तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रदीप तराणेकर, लोकमान्य संस्कृत विद्यापीठाचे कुलपती श्रद्धेय शिंदे नाना, ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने, राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव राजेंद्रप्रसाद मारवाडी, प्रांताधिकारी वासंती माळी, तहसीलदार शरद मंडलिक, नगराध्यक्षा शबाना बानो शेख आदी उपस्थित राहतील. संमेलनानिमित्त स्थळाला संत ज्ञानेश्वर संमेलन नगरी हे नाव देण्यात आले आहे. उद्घाटन सत्रानंतर ग्रंथकार प्रसादशास्त्री कुलकर्णी यांच्या श्रीहरिपाठामृतम्, श्रीगजानन विजय ग्रंथाचे प्रकाशन डॉ. वैद्य यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येईल. तसेच डॉ. कुलकर्णी यांना या वेळी विद्यानिधी (डी.लिट्.) उपाधीने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रमुख सत्रानंतर जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बोलठाण येथील डॉ. सुभाष जोशी, किशोर राठी, प्राचार्य गोविंदशास्त्री मोहिनी, निवृत्त शिक्षक शरद कुलकर्णी यांच्यासह १२ व्यक्तींना सन्मानित करण्यात येईल. येवला भूषण पुरस्काराचेही या वेळी वितरण करण्यात येईल. तसेच राज्यस्तरीय लोकमान्य टिळक गौरव पुरस्काराने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या त्र्यंबकेश्वर येथील राजेश दीक्षित, अविनाश पाटील, रेखा लाड यांच्यासह १३ व्यक्तींना सन्मानित करण्यात येईल.
संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या अनंत गोंठला, हर्षल देवडे, श्री ज्ञानेश्वरी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या महेश खोडे, निखिल भास्कर, प्राजक्ता वखारे, स्नेहल सैंदर, सुजित साळुंके, पथनाटय़ व विज्ञान नाटय़ोत्सवातील गुणवंतांचा सन्मान या वेळी होणार आहे.
सायंकाळच्या सत्रात, प्राचार्य गोविंदशास्त्री मोहनी यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे काव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये शंकर आहिरे, दीपक हिरे, भास्कर चव्हाण, सुहासिनी कोकणे, संजय भड, अभिजीत संत, बाळासाहेब सोमासे, नागेश बापट आदी कवी सहभागी होतील. संस्कृतप्रेमींसह साहित्यप्रेमींनी संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रा. संतोष विंचू यांनी केले आहे.