आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील युवा वर्गाचा आवाज समाजासमोर आणण्यासाठी महाराष्ट्र युवा परिषदेने ‘युवा जाहीरनामा २०१४’ तयार केला असून उमेदवारांनी हा जाहीरनामा स्वीकारून आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र युवा परिषद ही युवकांची संघटना असून युवकांच्या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी कार्य करीत आहे. सध्या २५ जिल्ह्यात संघटना पोहचली असून १० हजारपेक्षा अधिक युवक सदस्यांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. महाराष्ट्रात युवकांची संख्या ४३ टक्के असून त्यांच्या विकासासाठी सरकारकडून ठोस धोरणात्मक पावले उचलण्यात आलेली नसल्याचा आरोप परिषदेने केला आहे. राज्य शासनाने युवा धोरण जाहीर केले असले तरी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. राजकीय पक्ष प्रत्येक निवडणुकीदरम्यान आपला जाहीरनामा प्रसिद्ध करतात. त्यात युवकांच्या सर्वागीण विकासासाठी भूमिकांचा अभाव दिसत असतो. त्यामुळे तळागाळातील युवकांच्या प्रश्नाला वाचा फुटण्यास तसेच त्यांच्या आशा आकांक्षा व्यक्त करण्यास वाव मिळत नाही. युवा जाहीरनाम्यात युवकांच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टिने शिक्षण, रोजगार, आरोग्य, निवारा, पर्यावरण, प्रसार माध्यम, सुशासन अशा विविध प्रश्नांची सद्यस्थिती मांडून त्या संदर्भातील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. महाराष्ट्रातील युवा वर्ग, राजकीय पक्ष आणि निवडणुकीतील उमेदवार हा जाहीरनामा स्वीकारून आपली भूमिका स्पष्ट करतील व त्यानुसार राज्यातील युवा पिढीच्या विकासाच्या दृष्टीने काम करण्यासाठी कटीबद्ध राहतील अशी अपेक्षा युवा परिषदेने व्यक्त केली आहे.