गुंडगिरी आणि खंडणी वसुलीमुळे उद्योजक धास्तावले आहेत. ही गुंडगिरी, खंडणीची लागलेली कीड मुळापासून उखडून टाकण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशा आशयाचे निवेदन इचलकरंजी शटललेस लूम ओनर्स असोसिएशनच्या वतीने इचलकरंजी गावभागचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले व शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक दुयरेधन पवार यांना देण्यात आले.
सकाळी ११ वाजता कल्याण केंद्र येथून मोर्चाला सुरुवात झाली. प्रमुख मार्गावरून हा मोर्चा पोलीस उपाधिक्षक कार्यालय येथे आला. त्या ठिकाणी श्री. इंगवले व श्री. पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
गत दहा वर्षांपासून शहर आणि परिसरात शटललेस लूमची वाढ मोठय़ा प्रमाणात झाली आहे. सुमरे १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक उद्योजकांनी केलेली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात रोजगारही उपलब्ध झालेला आहे. खंजिरे औद्योगिक वसाहत, लक्ष्मी औद्योगिक वसाहत, पार्वती इस्टेट, चंदूर, कबनूर, कोरोची, रुई, तारदाळ, खोतवाडी परिसरात हा उद्योग मोठय़ा प्रमाणात पसरला आहे. शहरात गत ५० वर्षांपासून औद्योगिक शांतता टिकून होती. परंतु गत काही महिन्यांपासून समाजकंटकांकडून निरनिराळ्या कारणांवरून कारखानदारांना वेठीस धरून दहशत निर्माण करण्याचे प्रकार घडले आहेत. परंतु गुंडांच्या दहशतीमुळे कारखानदार तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. अशा गुंडांवर कारवाई व्हावी अशी कारखानदारांची अपेक्षा आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.
या मोर्चात इचलकरंजी शटललेस लूम ओनर्स असोसिएशन, इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशन, जिल्हा पॉवरलूम असोसिएशन, रुटीसी लूम असोसिएशन, राष्ट्रवादी पॉवरलूम असोसिएशन, जागृती यंत्रमागधारक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह यंत्रमागधारक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.