25 February 2021

News Flash

मिरजेतील नाटय़गृहात बालगंधर्वाचा पुतळा बसवण्यात प्रशासनाचे औदासिन्य

कोटय़वधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या सांगली महापालिकेला मिरजेतील बालगंधर्व नाटय़गृहाच्या दर्शनी भागात बालगंधर्वाचा पुतळा बसविण्याचेही औदार्य गेली ६ वष्रे झालेले नाही.

| January 26, 2014 01:25 am

    कोटय़वधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या सांगली महापालिकेला मिरजेतील बालगंधर्व नाटय़गृहाच्या दर्शनी भागात बालगंधर्वाचा पुतळा बसविण्याचेही औदार्य गेली ६ वष्रे झालेले नाही. या रंगभूमीवरूनच बालगंधर्वानी आपल्या अभिनयाचे पहिले पाऊल टाकून कलासक्त सांगली, मिरजकरांना नाटय़ाभिनयाची वेगळी अनुभूती दिली. त्याच नगरीत सांस्कृतिक क्षेत्राबद्दलचे औदासिन्य अक्षम्य वाटत आहे.
    सांगली, मिरज आणि कूपवाड शहराची महापालिका होताच सांस्कृतिक चळवळीतून मिरजेतील बालगंधर्व नाटय़गृहाचे नूतनीकरण करण्याची मागणी झाली. त्यातून नाटय़गृहाचे केवळ नूतनीकरण न करता पुनर्बाधणी करण्याचा प्रस्ताव महापालिकेने हाती घेतला. त्यानुसार ६ कोटी ५० लाख रुपये खर्च करून नवीन नाटय़गृहाची उभारणी करण्यात आली. या ठिकाणी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  केवळ सांस्कृतिक कार्यक्रम करणे एवढाच उद्देश न ठेवता सांस्कृतिक चळवळीला प्राधान्य मिळावे, नाटय़ चळवळ वाढावी, अभिनयाचे प्रशिक्षण मिळावे अशी रचना या ठिकाणी करण्यात आली आहे.  संपूर्ण नाटय़गृह वातानुकूलित यंत्रणेने सज्ज असले तरी वीजबिलामुळे सध्या या यंत्रणेचा वापर खचीतच होतो.
    नाटय़गृहाच्या दर्शनी भागात बालगंधर्वाचा पुतळा बसविण्यासाठी चबुतरा तयार करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी पुतळा न बसविता ६ इंच बाय ८ इंच चित्रप्रतिमा बसविण्यात आली आहे. उद्घाटनाचा कार्यक्रम २००५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी घाईगडबडीत कार्यक्रम झाला म्हणून पुतळा नंतर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अद्याप पुतळा बसविण्यासाठी महापालिकेला कृती करावीशी वाटलेली नाही.
    हंसप्रभा थिएटर या नावाने तत्कालीन संस्थानिक पटवर्धन यांनी या नाटय़गृहाची उभारणी केली होती. ऑक्टोबर १९०५ मध्ये बालगंधर्व तथा नारायण श्रीपाद राजहंस या रंगकर्मीचा शोध मराठी नाटय़चळवळीला याच रंगमंदिरात लाभला. बालगंधर्वानी यावेळी संगीत शारदा या नाटकातील नटीची भूमिका साकारली होती. याच रंगभूमीवर बालगंधर्वाच्या अभिनयाने नटलेले गुप्तमंजूषा या नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी लोकमान्य टिळक, राजश्री शाहू महाराज यांची उपस्थितीही लाभली होती.  
अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रंगभूमीचा वापर सांस्कृतिक चळवळीसाठी व्हावा. याकरिता नाटय़रसीकांनी आंदोलन उभे केले होते.  या आंदोलनाचे नेतृत्व ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त वि. स. खांडेकर यांनी केले होते. या आंदोलनाची दखल घेत १९५२ मध्ये तत्कालीन मिरज नगरपालिकेने नाटय़गृह ताब्यात घेतले. माधवराव पटवर्धन यांच्याकडून ताबा घेतल्यानंतर हंसप्रभा स्टुडिओचे बालगंधर्व नाटय़मंदिर असे नामकरण करण्यात आले. १९८९ मध्ये या ठिकाणी बालगंधर्वाचा अर्धपुतळाही बसविण्यात आला होता.  मात्र नूतनीकरण करीत असताना हा पुतळा नगरपालिकेने हलविला असून तो सध्या महापालिकेच्या ताब्यात आहे. या ठिकाणी कोटय़वधी रुपये खर्च करणाऱ्या महापालिकेला बालगंधर्वाचा पुतळा बसविण्यासाठी आíथक तरतूद करता येणार नाही अशी परिस्थिती मुळीच नाही. मात्र इच्छाशक्तीचा अभाव हाच यामागे असावा अशी शंका नाटय़रसिक व्यक्त करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2014 1:25 am

Web Title: statue of balgandharva in miraj theater no interest to administration
टॅग : Sangli
Next Stories
1 रिपाइं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत सांगलीत मारामारी, पाच जखमी
2 सपाटे-कोठे संघर्ष अन् पोलीस ठाण्यात समझोता
3 सोलापुरात ठिबक सिंचनाची गती १५ टक्क्य़ांवरच
Just Now!
X