लग्न जमविताना खोटी माहिती द्याल, नवऱ्याला फसवून कुणाला भेटायला जाल, आई वडिलांशी खोटे बोलून पबमध्ये जाल  किंवा कार्यालयात खोटी कागदपत्रे द्याल तर सावधान. तुमच्या सर्व हालचालींवर गुप्तहेरांमार्फत लक्ष ठेवले जात असू शकते हे लक्षात ठेवा. गुप्तहेरांची मदत घेण्याचे प्रमाण वाढू लागले असून त्यामुळे गुप्तहेरांचा धंदाही तेजीत आला आहे. रहस्यकथा आणि चित्रपटात दिसणारे गुप्तहेर व्यावसायिक स्वरूपात काही वर्षांपूर्वी मुंबईत उदयास आले. तेव्हा गुप्तहेरांचा वापर श्रीमंत वर्गात प्रामुख्याने पत्नीचे किंवा पतीचे कुठे विवाहबा’ा संबंध आहेत का हे तपासण्यासाठी होत असे. परंतु आता बदलत्या काळाबरोबर फसवणुकीचे प्रकार वाढल्यामुळे गुप्तेहाराची मदत वाढत्या प्रमाणात घेतली जाऊ लागली आहे.
लग्न जुळविण्यापूर्वी
हल्ली बरीचसे विवाह विवाहसंस्था तसेच विवाहविषयक संकेतस्थळांवरून जुळवले जातात. तिथे दिलेली माहिती खरी आहे का त्याची शहानिशा गुप्तहेरांमार्फत केली जाते. गुप्तहेर आठ दिवसांत त्याची माहिती काढून देतात. प्रतिदिन ३ हजार रुपयांपासून २० ते २५ हजारांत ही माहिती काढून दिली जात असल्याचे ‘सिक्रेट आय एजन्सी’चे डी कुमार यांनी सांगितले. परदेशातील वधू वरांना भारतातील स्थळे संकेतस्थळावर दिसतात. त्यांना भारतात येऊन त्यांची खरी माहिती काढता येत नाहीत. अशा वेळी गुप्तहेर मदत करतात. अगदी त्याची शैक्षणिक पात्रता, तो घटस्फोटित आहे का, त्याचे घर स्वत:चे आहे की भाडय़ाचे, व्यसनी आहे का, खरोखर सांगितलेल्या ठिकाणीच काम करतो का, नोकरी व्यवसाय कितपत खरा आहे एवढी माहिती काढून दिली जाते. अगदी संबंधिताला एखादा आजार आहे का तो कुठली औषधे घेतो तेही गुप्तहेर तपासून देतात. लग्नाला लाख दोन लाख खर्च करत असतांना गुप्तहेरांकडून लग्नाआधी वीस पंचवीस हजार रुपये खर्चून खरी माहिती काढण्याचा पर्याय लोकांना सोपा वाटू लागला असल्याचे ‘लोटस डिटेक्टिव्ह सव्‍‌र्हिसेस’चे उत्पल चौधरी यांनी सांगितले.
जोडीदारावर नजर
लग्नानंतर पत्नीवर किंवा पतीवर नजर ठेवणे हे गुप्तहेरांना मिळणारे मोठे काम. विवाहबा’ा संबंध हा प्रकार उच्चभ्रू वर्गापासून मध्यवर्गीयांध्येही आहे. कामानिमित्त पती पत्नी दिवसभर बाहेर असतात. ते कुणाला भेटतात काय करतात ते तपासण्यासाठी गुप्तहेर त्यांच्या मागे लावले जातात. त्यांचे फोटो काढून स्पाय कॅमऱ्याने चित्रिकरण करून त्याचे पुरावे दिले जातात. घटस्फोट देताना या पुराव्यांचा उपयोग होतो.
कॉर्पोरेट कंपन्या आणि गुप्तहेर
मोठय़ा कंपन्या आणि कॉर्पोरेट कंपन्या हमखास गुप्तहेराचा वापर करतात. आपल्या कर्मचाऱ्यांनी दिलेली शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी गुप्तहेरांची मदत घेतात. हे गुप्तहेर संबंधित विद्यापीठ आणि संस्थेतून त्या कर्मचाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र, पदव्या खऱ्या आहेत की खोटय़ा ते तपासतात. या शिवाय ते कुणा प्रतिस्पध्र्याला भेटून काही व्यावसायिक माहिती बाहेर फोडतात का त्यावरही गुप्तहेरामार्फत लक्ष ठेवले जाते. कंपन्यांची नकली उत्पादने कुठे बनतात, बाजारात ती कोण आणतात याची माहिती गुप्तहेरांमार्फत काढून ठेवली जाते.
मुलांवर नजर ठेवण्यासाठी
वयात आलेली मुले स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार करतात. पालक त्यांना थेट विचारू शकत नाहीत. अशा वेळी गुप्तहेर मदतीला येतात. मुले कुणासोबत जातात, कॉलेजच्या नावाखाली काय करतात, व्यसनाच्या नादी लागले आहेत का आदी माहिती काढली जाते. सर्वसामान्य माणसेही कामांसाठी गुप्तहेरांकडे येत असल्याचे महिला गुप्तहेर रजनी पंडित यांनी सांगितले. नवरात्रीच्या दिवसात तर या गुप्तहेरांना खूप मागणी असते जे काम पोलीस करत नाही, ते काम गुप्तहेर करत असल्याचे पंडित यांनी सांगितले. हे गुप्तहेर अगदी फिल्मी पद्धतीने पाठलाग करून, वेशांतर करून पाळत ठेवत असतात. एखादी व्यक्ती कुठल्या पबमध्ये गेली, व्यसनी आहे का त्याचे फोटो काढून किंवा स्पाय कॅमेऱ्याने चित्रिकरण करुन पुरावा दिला जातो.
गुप्तहेरांचे दुकान
गुप्तहेरांची वाढलेली मागणी पाहून त्यांचे दुकानही तेजीत आहे. मुंबईत नामवंत आणि जाणकार अशा १० ते १२ गुप्तहेर एजन्सी आहेत. परंतु वर्तमानपत्रात जाहिराती देऊन ग्राहकांना आकर्षित करणारे गुप्तहेरही वाढत आहेत. देशपातळीवर गुप्तहेरांच्या दोन संघटना आहेत. ऑल इंडिया प्रायव्हेट डिटेक्टीव एजन्सी ही त्यातील प्रमुख. सरकार दरबारी गुप्तहेरांच्या संघटनेला आणि कार्याला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.