News Flash

म्हाडातील हस्तांतरण दलालांपासून सावधान

खोटय़ा सहीशिक्क्य़ांनिशी कागदपत्रांची बनवाबनवी.. म्हाडा सोसायटीतील घरांच्या हस्तांतरणासाठी म्हाडा कार्यालयात खेटे घालण्यापेक्षा दलालाला पैसे देण्याचा मार्ग तुम्हाला सोयीचा वाटत असेल तर सावधान.

| November 20, 2013 08:32 am

म्हाडातील हस्तांतरण दलालांपासून सावधान

खोटय़ा सहीशिक्क्य़ांनिशी कागदपत्रांची बनवाबनवी..
म्हाडा सोसायटीतील घरांच्या हस्तांतरणासाठी म्हाडा कार्यालयात खेटे घालण्यापेक्षा दलालाला पैसे देण्याचा मार्ग तुम्हाला सोयीचा वाटत असेल तर सावधान. पैसे घेऊन खोटी कागदपत्रे विकणाऱ्या चारकोपमधील एका दलालाचे पितळ उघडे पडले आहे. अशी खोटी कागदपत्रे देणाऱ्या दलालांचा सुळसुळाट झाल्याचे म्हाडा अधिकारीही मान्य करत आहेत.
चारकोप येथील ‘स्नेह पूनम’ सहकारी सोसायटीत घर घेणाऱ्या तारामती अहिर यांनी म्हाडाकडून परवानगी आणण्यासाठी सेक्टर ६ मध्येच राहणाऱ्या दिलीप आचरेकर या दलालाला मार्च २०१३ मध्ये पैसे दिले. आचरेकरने त्यांना – म्हाडाचा शिक्का तसेच मिळकत व्यवस्थापकाची सही असलेले – जावक क्रमांक उमुअ डब्ल्यू मुं. मं. ११२९२०१३ असे लिहिलेले ना हरकत प्रमाणपत्र दिले. अहिर यांनी ते संबंधित संस्थेकडे सोपवले. मात्र प्रमाणपत्रावरील सहीबाबत संस्था सदस्यांना संशय आल्याने अहिर यांनी म्हाडा कार्यालयाकडे याबाबत माहिती अधिकाराअंतर्गत विचारणा केली. तेव्हा या जावक क्रमांकावर असे कोणतेही प्रमाणपत्र दिले गेले नसल्याचे उघड झाले. स्नेह पूनम संस्थेने आचरेकर यांना बोलावून दमात घेतल्यावर खोटे कागदपत्र दिल्याचे व पुन्हा असे करणार नसल्याचे आचरेकर यांनी लिहून दिले. मात्र एकदा चोरी उघडकीला येऊनही आचरेकरने खोटी कागदपत्रे बनवण्याचा उद्योग सोडला नाही. जूनमध्ये लता कॉन्ट्रेक्टर यांनी त्यांच्या घराच्या हस्तांतरणासाठी आचरेकरला काम सोपवल्यावर त्याने पुन्हा एकदा खोटी कागदपत्रे तयार करून दिली. लता कॉन्ट्रेक्टर यांना दिलेले पत्र म्हाडाकडून देण्यात आले नसल्याचे म्हाडाने कळवले आहे. यांसंबंधी त्यांनी चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांकडून अजून कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत,’ अशी तक्रार लता कॉन्ट्रॅक्टर यांनी केली.म्हाडाने बांधलेल्या गृहनिर्माण सोसायटीमधील घरे मूळ मालकांकडून खरेदी करणाऱ्यांना ही घरे नावावर हस्तांतरीत करण्यासाठी म्हाडाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घ्यावे लागते. म्हाडाकडे फेऱ्या मारण्याऐवजी दलालांकडून ही कागदपत्रे घेण्याचे प्रमाण मोठे आहे. स्नेह पूनम सहकारी संस्थेला या खोटय़ा कागदपत्रांचा संशय आल्याने हे बिंग फुटले. मात्र अशी खोटी कागदपत्रे अनेकांकडे असण्याची शक्यता आहे. भविष्यात पुनर्विकास किंवा इतर बाबींसाठी अधिकृत कागदपत्रे लागल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

हस्तांतरण कसे होते?
घराचे हस्तांतरण करण्याची जबाबदारी संबंधित गृहनिर्माण संस्थेची असते. मात्र त्यासाठी म्हाडाकडून ना हरकत प्रमाणपत्र लागते. त्यासाठी आधी संबंधित संस्थेकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. ना हरकत प्रमाणपत्रासाठी म्हाडा कार्यालयात अर्ज उपलब्ध असतात. खरेदी-विक्रीची कागदपत्र, संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र, अर्ज तसेच हस्तांतरणासाठी लागणारे शुल्क भरल्यावर हे प्रमाणपत्र दिले जाते. परिसर, घराचे क्षेत्रफळ आणि घर किती वर्षांपासून आहे, यावर हे शुल्क ठरते.

ना हरकत प्रमाणपत्रे देण्यासाठी म्हाडाने दलाल नेमलेले नाहीत. यासंबंधी म्हाडाकडून नियमितपणे नागरिकांना जागरूक केले जाते. हे दलाल म्हाडाने नेमलेले नसल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करता येत नाहीत. त्यामुळे म्हाडा संस्थेतील रहिवाशांनीच याबाबत काळजी घेण्याची गरज आहे.
वैशाली सिंग,
जनसंपर्क अधिकारी, म्हाडा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2013 8:32 am

Web Title: stay aware from dealers in mhada
टॅग : Mhada
Next Stories
1 स्वच्छतागृहांसाठी पालिका उदासीन!
2 आचार्य पार्वतीकुमारांची कलाकृती अर्धशतकानंतर रंगमंचावर
3 पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात सातवे डायलिसिस केंद्र
Just Now!
X