जि. प.च्या कृषी अधिकारीपदाचा संभ्रम
जिल्हा परिषदेच्या कृषीचे विभागप्रमुख कोण? याविषयी सध्या संभ्रमावस्था आहे. दोन दिवसांपूर्वीच विभागप्रमुख म्हणून कृषी विकास अधिकारीपदाची सुत्रे स्वीकारणाऱ्या विलास नलगे यांच्या नियुक्तीस कृषी आयुक्तांनी स्थगिती दिल्याने हा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने मंत्रालय स्तरावरुन मार्गदर्शन मागवले आहे.
जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी म्हणून संभाजीराव गायकवाड यांनी गेली अडीच वर्षे काम पाहिले. मंगळवारी राज्यातील वर्ग २ पदावरील ९३ कृषी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या झाल्या. त्यात नगर जिल्ह्य़ातील चौघा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जि. प.चे कृषी अधिकारी दीपक पटेल यांची गडचिरोलीला, कृषी अधीक्षक कार्यालयातील तंत्र अधिकारी विलास नलगे यांची जि. प. कृषी विकास अधिकारीपदी, श्रीगोंद्याचे तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मगर यांची पुणे व अकोल्याचे तालुका कृषी अधिकारी गवांडे यांची नंदूरबार येथे पदोन्नतीने बदली झाली.
नलगे यांची जि. प.कडे बदली होताना या पदावरील गायकवाड यांना मात्र नियुक्तीचे ठिकाण दिले गेले नाही. गायकवाड बदलीसाठी प्रयत्नशील होतेच. त्यांना जि. प.ने कार्यमुक्त केले. परंतु ते त्रिशंकू अवस्थेत राहिले. त्यामुळे नलगे यांनी मंगळवारी सायंकाळी तातडीने जि. प. कृषी विभागाची सुत्रे स्वीकारली. जि.प.नेही तसा मंत्रालयात अहवाल पाठवला. परंतु नंतर लगेच बुधवारी सायंकाळी नलगे यांच्या पदोन्नतीने दिलेल्या पदस्थापनेस कृषिमंत्र्यांच्या सूचनेनुसार कृषी आयुक्तांनी स्थगिती दिली. जि.प.च्या कृषी विकास अधिकारी पदाची नलगे यांनी सुत्रे स्वीकारली, गायकवाड यांनी सोडली, तसेच नलगे यांच्या नियुक्तीस मिळालेली स्थागिती यामुळे जि.प.मध्ये कृषीचा विभागप्रमुख कोण असा प्रश्न उपस्थित झाला.
त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील यांनी यासाठी ग्रामविकास व कृषी अशा दोन्ही मंत्रालयांकडे याबाबत मार्गदर्शन मागवले असल्याचे
समजले. दरम्यान, कृषी विभागाच्या वतीने दि. ७ रोजी आदर्श गोपालक व आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण होणार आहे.