जिल्हा परिषदेच्या वतीने नाटय़गृह व व्यापारी संकुल बांधकामानिमित्त प्रक्रिया चालू असताना वास्तुविशारद नियुक्तीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, जमिनीचा फेर जि.प.च्या नावावर झाला नसल्याने वास्तुविशारद नियुक्त करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला जि.प. प्रशासनाकडून तात्पुरती स्थगिती मिळाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
जमिनीचा फेर जि.प.च्या नावाने करणे, या जागेवर नाटय़गृह व व्यापारी संकुल बांधणे, त्यासाठी वास्तुविशारद नियुक्त करणे अशा प्रकारची प्रक्रिया सुरू होती. जिल्हाधिकाऱ्यांकडे जमिनीचा फेर जि.प.च्या नावे घेण्याकरिता लेखी मागणी केली. हे लवकर पूर्ण होणार हे गृहीत धरून गेल्या ७ नोव्हेंबरच्या सभेत नाटय़गृह व व्यापारी संकुल बांधण्यासाठी वास्तुविशारद नेमणे हा एकूण प्रक्रियेचा भाग होता. परंतु जि.प.च्या नावावर जमिनीचा फेर अजून झाला नाही. त्यामुळे वास्तुविशारद नेमण्यापासून संपूर्ण प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय जि.प. प्रशासनाने घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांनी सांगितले, की बांधा-वापरा-हस्तांतर करा या बाबत प्रशासनाने कोणताच निर्णय घेतला नाही. केवळ जागा नावावर झाल्यानंतर नाटय़गृह व व्यापारी संकुल बांधकामाचा प्रस्ताव होता व त्यासाठी नकाशा तयार करणे, त्याची किंमत ठरविणे, निविदा काढणे, त्याला प्रशासकीय मान्यता ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी वास्तुविशारद नेमण्याचा प्रशासनाचा हेतू होता. परंतु जागा जि.प.च्या नावावर झाली नसल्याने या संपूर्ण प्रक्रियेस स्थगिती दिल्याचे त्यांनी सांगितले.