मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना गोंदे ते पिंपळगाव या सुमारे ८० किलोमीटरच्या टप्प्यासाठी राज्यात सर्वाधिक ठरू शकणारी टोल दरवाढ स्थानिकांच्या प्रखर विरोधामुळे चार दिवसांसाठी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. या दरवाढीस विरोध होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर, २३ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित यंत्रणा व टोल व्यवस्थापन कंपनी यांची संयुक्त बैठक बोलाविली आहे. या वेळी त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. या नाक्यावरील टोलचे वाढीव दर हे मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारकांचे आर्थिक कंबरडे मोडणार ठरणार असल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. कंपनीने वाढीव टोल आकारणी तातडीने लागू करण्याची तयारी केली असताना दुसरीकडे अपूर्ण रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याशिवाय त्याची अंमलबजावणी करू दिली जाणार नसल्याचा इशारा सर्वपक्षीयांनी दिला आहे. हा प्रश्न चिघळण्याच्या मार्गावर असल्याने पोलीस यंत्रणेने मोठा फौजफाटा व दंगा नियंत्रक पथक पिंपळगाव येथे हलविले आहे. दुसरीकडे टोल कंपनीने नाक्यावर संरक्षण जाळी उभारली आहे.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात गोंदे ते पिंपळगाव या टप्प्याची टोल वसुली पिंपळगाव येथील नाक्यावर करण्यात येते. या टप्प्याचे ७५ टक्के काम पूर्ण झाल्यावर त्या प्रमाणात टोल वसुली सुरू झाली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी टोलच्या दरात तीनपट वाढ लागू करण्याचे जाहीर करण्यात आले. महिलांकडून व्यवस्थापन केला जाणारा हा देशातील पहिलाच टोल नाका आहे. वेगवेगळ्या कारणांनी सातत्याने तो चर्चेत असतो. वाहनधारकांशी अरेरावीने बोलणे, लोकप्रतिनिधींशी हुज्जत घालणे असे प्रकार अनेकदा या ठिकाणी घडलेले आहेत. अशाच एका वादात टोल कंपनीने शिवसेना आमदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. वास्तविक, ४० किलोमीटरच्या परिघात दोन टोल नाके नसावेत असा सर्वसाधारण निकष आहे. परंतु, या टोल नाक्यापासून अवघ्या २५ ते ३० किलोमीटर अंतरावर चांदवड येथे दुसरा टोल नाका आहे.
पिंपळगाव नाक्यावर नव्याने आकारल्या जाणाऱ्या टोलचे दर पाहिल्यास वाहनधारकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ येईल. ही रक्कम भरताना वाहनधारक भरडला जाणार असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी टोल दरवाढीची अंमलबजावणी केली जाणार होती. परंतु, मतमोजणीमुळे पोलीस संरक्षण उपलब्ध न झाल्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी पुढे ढकलली गेली. रस्ता व उड्डाणपुलाचे रखडलेले काम पूर्ण होईपर्यंत टोल वाढ झाल्यास नाका नष्ट करण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेने राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. कंपनीने मंगळवारी सकाळपासून टोल आकारणी लागू करण्याचे सूतोवाच केल्याने मोठा पोलीस फौजफाटा पिंपळगाव येथे आणण्यात आला. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी २३ मे रोजी बैठक बोलाविल्यामुळे कंपनीने ही वाढ लागू करण्याचे तूर्तास स्थगित केले.

तोडगा काढण्याचा प्रयत्न
पीएनजी कंपनीच्या टोल नाक्यास पोलीस संरक्षण उपलब्ध करण्याची ग्वाही प्रशासनाने दिली आहे. टोल दरवाढीच्या मुद्दय़ावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी, टोल व्यवस्थापन आणि या विषयाशी संबंधित सर्व यंत्रणांची २३ मे रोजी संयुक्त बैठक बोलाविण्यात आली आहे. मागील वेळी चर्चेद्वारे अनेक विषयांवर तोडगा काढण्यात आला होता. टोल व्यवस्थापनाने निकष बाजूला ठेवून संपूर्ण निफाड तालुक्यास टोलमधून वगळले. काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी सवलत देण्याचे मान्य केले. या सवलती पुढील काळातही सुरू राहणार आहेत. स्थानिकांना आक्षेप असणाऱ्या मुद्दय़ांवर चर्चा करून तोडगा काढता येईल. या बाबींवर बैठकीत चर्चा होणार आहे.
विलास पाटील
जिल्हाधिकारी, नाशिक

बैठकीनंतर वाढीव टोलची अंमलबजावणी
या विषयावर जिल्हा प्रशासनाने २३ मे रोजी बैठक बोलाविली आहे. या बैठकीनंतर टोल दरवाढ लागू केली जाईल. तोपर्यंत ही दरवाढ लागू न करण्याचे कंपनीने निश्चित केले आहे.
वसुंधरा राव
व्यवस्थापक, पीएनजी टोल कंपनी