महापालिकेतील अधिकारी बहुतेक वेळा दालनात हजर नसतात. परिणामी सर्वसामान्यांची छोटी-छोठी कामे अडतात. येणारा माणूस वैतागतो. यापुढे असे होऊ नये म्हणून महापालिकेतील अधिकाऱ्यांसह आयुक्तांनीही दररोज दुपारी ४ ते संध्याकाळी ६ या वेळेत दालनात उपस्थित राहावे, अशी सूचना स्थायी समिती सभापती विकास जैन यांनी केली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची गैरहजेरी व कामातला वेळकाढूपणा यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
महापालिकेतील अधिकाऱ्यांना बऱ्याचदा अंदाजपत्रके तयार करताना प्रत्यक्ष स्थळपाहणी करावी लागते. त्यामुळे त्यांना बाहेर जावे लागते. हे मान्य केले, तरी कार्यालयाबाहेरील कामे सकाळच्या सत्रात उरकून दुपारी ४ ते संध्याकाळी ६ या वेळेत अधिकाऱ्यांनी दालनातच थांबावे. या बाबतचे पत्र गेल्या महिन्यात सभागृह नेता राजू वैद्य यांनी दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. नगरसेवक व पदाधिकारी वेगवेगळ्या कामांसाठी भ्रमणध्वनीवरून अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. अधिकारी बहुतेकवेळा ‘आउट ऑफ कव्हरेज एरिया’मध्ये असतात, अशी तक्रार राजू वैद्य, गिरजाराम हळनोर व समीर राजूरकर यांनी केली. यावर बोलताना स्थायी समितीचे सभापती जैन म्हणाले की, केवळ एवढेच नाही तर एक संचिका एका अधिकाऱ्याजवळ किती दिवस असावी यावरही बंधने असायला हवीत. सदस्यांच्या तक्रारींचा विचार करता सर्व अधिकाऱ्यांनी ४ ते ६ या वेळेत दालनातच असावे, असे आदेश देण्यात आले. कार्यालयातील उपस्थितीबरोबरच संचिका गायब असल्याचा विषयही चर्चेत आला. वॉर्ड क्र. ७७ च्या नगरसेविका घडामोडे यांनी जिजाऊ उद्यानाच्या सुशोभिकरणाची संचिका का सापडत नाही, असा सवाल केला. मागील तीन बैठकांपासून हा विषय चर्चेत येत आहे. पण ती संचिका दडवून ठेवली जाते. या बाबत गंभीर नोंद घेण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले. ही संचिका किती दिवसांपासून गायब आहे, असा सवाल केला गेला. तेव्हा या प्रकरणात लक्ष घालू, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. एकदा ही संचिका सादर करण्यात आली होती. त्याला आर्थिक तरतूद नव्हती. आता पुन्हा ती कोठे आहे, याचा शोध घेतला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.