उपराजधानीच्या आर्थिक आणि सामाजिक स्तरात वाढ झाल्याचे चित्र रंगविण्यात येत असताना शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरला आहे. गेल्या महिनाभरात विनयभंग, बलात्काराच्या घटनांमुळे उपराजधानीवर कलंक लागला आहे. गेल्या २४ तासात एमआयडीसी आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नव्याने विनयभंगाच्या गुन्ह्य़ांची नोंद करण्यात आली. या घटना रोजच्याच झाल्या असून मुलींनी कसे जगावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जनसंवाद अभ्यासक्रमाच्या एका आसामी विद्यार्थिनीवर प्राध्यापकानेच बलात्कार केल्याची तक्रार गुरुवारी नोंदविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्राध्यापक एका हिंदी दैनिकात क्रीडा वार्ताहर असून पळून जाण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याने आता एका खाजगी इस्पितळात उपचारासाठी दाखल झाला आहे. ही मुलगी एका वृत्तवाहिनीत र्पिोटर असून तिच्यावर सतीश दंडारे याने बलात्कार केल्याचा तसेच तिची अश्लील चित्रफीत केल्याची तक्रार सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. प्रॅक्टिकलचे मार्क देण्याच्या नावाखाली मुलींची लैंगिक छळवणूक केली जात असल्याचा गौप्यस्फोट सदर तक्रारकर्त्यां मुलीने केला असून यामुळे शिक्षण क्षेत्रातील एकंदर बजबजपुरीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक प्राध्यापक प्रॅक्टिकलचे चांगले गुण देण्याच्या आमिषाखाली मुलींचे लैंगिक शोषण करीत असल्याचे या मुलीने सांगितल्याने अशा प्रकारात सामील असलेल्यांचे धाबे दणाणले आहे.
अनेक मुली अशा घटनांच्या शिकार होऊनही बदनामी आणि अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीने तक्रार करण्यासाठी समोर येत नाहीत. ही २७ वर्षीय मुलगी काँग्रेसनगरातील एका नामांकित महाविद्यालयात एम.ए. (जनसंवाद) अंतिम वर्षांची विद्यार्थिनी आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात करिअर करण्याची स्वप्ने घेऊन ही मुलगी आसाममधून नागपूरला आली होती. सतीश दंडारे या तिला जनसंपर्क हा विषय शिकवित होता. त्याने या मुलीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला.याची व्हीडिओफीत त्याने तयार करून मुलीला ब्लॅकमेल करणे सुरू केले. एवढेच नव्हे तर एका मित्राशी शारीरिक संबंध ठेवण्याचीही बळजबरी केली. यानंतर तिने थेट पोलीस आयुक्तांचीच भेट घेऊन आपबिती कथन केल्यानंतर सूत्रे फिरली. या प्राध्यापकाविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही घटना ताजी असतानाच एमआयडीसी पोलिसांनी बार मालक आणि त्याच्या दोन मित्रांविरुद्ध ३२ वर्षी गायिकेचा विनयभंग केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. त्यांची नावे संजू जयस्वाल, भूपेंद्र चंद्रे आणि मोंटू मिश्रा अशी आहेत. ही गायिका दिल्लीची असून तिला ७० हजार रुपये महिना पगारावर जयस्वालने त्याच्या रायफल बारमध्ये गायिका म्हणून नोकरी दिली होती. तिला गेल्या ३ महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. बारमध्ये तिच्याशी वारंवार गैरवर्तणूक करण्यात येत होती, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षांच्या मुलीची छेडखानी करणाऱ्या २५ वर्षीय पिंटो रमेश हातीपिचेश या तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही मुलगी सायकलने जात असताना पिंटोने अश्लील शेरेबाजी केली आणि छेडखानीचा प्रयत्न केला. ही घटना तिने आईला सांगितल्यानंतर त्यांनी लगेच पाचपावली पोलीस ठाण्यात धाव घेतली.