शाहूपुरी येथील सॅमसंग मोबाईल शॉपी फोडून चोरटय़ांनी सुमारे १२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. यामध्ये मोबाईलचे १३५ नग, दोन डिजिटल कॅमेरे व रोख २० हजार ४३० यांचा समावेश आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.     शाहूपुरीतील साईक्स एक्स्टेन्शनमध्ये सॅमसंग मोबाईल शॉपी आहे. सांगली येथील व्यापारी शांतीकुमार यड्रावे हे त्याचे मालक आहेत. तिथे किरण धनवडे हे सहायक व्यवस्थापक आहेत. शुक्रवारी रात्री दुकान बंद करण्यात आले होते. शनिवारी ते बंद ठेवण्यात येते. रविवारी सकाळी धनवडे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना शटरचे कुलूप उचकटून टाकल्याचे निदर्शनास आले. चोरीचा संशय आल्याने त्यांनी यड्रावे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या सल्ल्यानुसार धनवडे यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दाखल केली.    
घटनास्थळी पोलीस व ठसेतज्ज्ञ दाखल झाले. लोखंडी शटरचा कोयंडा उचकटून चोरटय़ांनी आत प्रवेश केल्याचे दिसून आले. घटनास्थळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले. ते रेल्वे फाटकाजवळील रिक्षा थांब्यापर्यंत जाऊन घुटमळले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी धाडसी चोरी झाल्याने या भागातील व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे.