पंधराच दिवसांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती करत चोरटय़ांनी पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा फोडून सुमारे साडेतीन लाख रुपयांची रोकड पळवली. शनिवारी रात्री ते रविवार सकाळ दरम्यान ही घटना घडली. पाथर्डी पोलिसांनी आज गुन्हय़ाची नोंद केली आहे.
माणिकदौंडी हा दुर्गम भाग आहे. तेथील लोकवस्ती बहुतांशी ऊसतोडणी मजुरांची आहे. सध्या हे मजूर साखर कारखान्यांच्या गळीत हंगामासाठी बाहेर पडले आहेत. गावातील शाखा काल दुपारी चारच्या सुमारास बंद झाली. रात्री चोरटय़ांनी शाखा कार्यालयाच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. तेथील सायरनची वायर कापली. शाखेतील तिजोरी भिंतीत बसवलेली आहे. ती गॅस कटरच्या साहाय्याने तोडून रोख रक्कम ३ लाख ३० हजार १५४ रुपये लंपास केले.
सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात ही घटना आली. त्यांनी पोलीस व शाखाधिकारी भारत काशिद यांना माहिती दिली. काशिद यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. पंधराच दिवसांपूर्वी, दि. १७ ऑक्टोबरला जिल्हा सहकारी बँकेची, पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील शाखा अशाच गॅस कटरच्या साहाय्याने फोडून सुमारे १५ लाख ५० हजार रुपयांची रोकड पळवली गेली होती. त्याचा तपास अजूनही लागलेला नाही, तोच तालुक्यात ऐन दिवाळीत ही दुसरी घटना घडली.
पोलिसांनी श्वानपथकास पाचारण केले, मात्र १०० फुटांपर्यंतही माग निघू शकला नाही, त्यामुळे चोरटे वाहनातून पसार झाले असावेत, असा अंदाज आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक आमले करत आहेत. जिल्हय़ात इतरत्रही अशाच पद्धतीने जिल्हा बँकेच्या शाखांतून चोऱ्या झाल्या आहेत. जिल्हा बँकेच्या शाखांचे जिल्हय़ात विस्तृत जाळे आहे, परंतु बहुतांशी शाखांमधून सुरक्षारक्षक, सायरन, सीसीटीव्ही कॅमेरे आदी सुरक्षा यंत्रणा उभारण्याकडे लक्ष दिले गेलेले नाही, त्यामुळे चोरटय़ांनी जिल्हा बँकेच्या शाखा लक्ष्य केल्या आहेत.