येथील यल्लमा देवीच्या मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. देवीच्या पुजेचे वेगवेगळ्या प्रकारचे सोन्या-चांदीचे दागिने व दानपेटी चोरटय़ांनी लांबविली. १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचे राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. प्रत्यक्षात सहा लाखांहून अधिक रुपयांची चोरी झाली असल्याचे मंदिराच्या पुजाऱ्यांचे म्हणणे आहे.    
जवाहर नगरातील ओढय़ावर यल्लमा देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या पुजाऱ्यांनी बुधवारी रात्री मंदिर बंद केले होते. मध्यरात्रीच्या सुमारास दरवाजाचे लोखंडी ग्रील वाकवून चोरटय़ांनी आत प्रवेश केला. आतील तिजोरी कटावणीने उचकटून टाकली. आत असणारे देवीचे पूजा साहित्य त्यांनी लांबविले. सकाळी ६ वाजता मंदिराचे पुजारी सुनिल मेढे व मदन जाधव हे मंदिरात आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांना निदर्शनास आले. त्यांनी राजारामपुरी पोलिसांशी संपर्क साधला. घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले. ते मंदिरातील मागील बाजूने शेतातून आयटी पार्कपर्यंत जाऊन घुटमळले. श्वानपथक ओढय़ातून जात असताना तेथे फुटलेली दानपेटी, एक चवरी, एक पंचपात्र व  एक वाटी मिळाली.    
पोलिसात दिलेल्या फिर्यादीत विविध प्रकारच्या पूजा साहित्याची चोरी झाल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये एक प्रभावळ, चांदीच्या पादुका, तीन चौऱ्या, कलश, कुऱ्हाड, त्रिशूल, धनुष्य, पंचारती, दोन किरिट, मोरपीस पंखा या सोन्याच्या दागिन्यांबरोबर दानपेटीतील रोख रक्कमेचा समावेश आहे.