नवी मुंबईच्या उभारणीसाठी त्या वेळी आवश्यक असणाऱ्या दगडखाणी आता या शहराला डोकेदुखी ठरू लागल्या असून दगडखाणी क्षेत्रात कोसळणाऱ्या दरडींमुळे या दगडखाणी बंद करा, अशी मागणी वाढू लागली आहे. दगडखाणीमुळे होणारे प्रदूषण हा येथील लोकांचा गेली अनेक वर्षे चिंतेचा विषय झाला आहे. दरम्यान, योग्य ते पुनर्वसन करून हा उद्योग बंद करा, अशी मागणी दगडखाण मालकांनी सिडकोकडे केली आहे.
नवी मुंबईची निर्मिती करताना येथील सर्व प्रकारच्या बांधकामासाठी लागणारी खडी, दगड, भुकटी जवळपास तयार व्हावी यासाठी पूर्व बाजूच्या पारसिक डोंगराच्या पायथ्याशी दगडखाणी सुरू करण्यात आल्या. त्यात सिडकोने सुमारे ९४ दगडखाणींना परवानगी दिली असून याशिवाय एमआयडीसी-४, वन विभाग-११ आणि जिल्हाधिकारी-४ अशा जवळपास ११३ दगडखाणी गेली ४० वर्षे सुरू आहेत. त्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाने चार दगडखाणी बंद केल्या असून ती जागा डंपिंग ग्राऊंडसाठी देण्यात आली आहे. शहर उभारणीपर्यंत हव्याहव्याशा वाटणाऱ्या दगडखाणी आता नकोशा झाल्या आहेत. त्यात पावसाळ्यात दगडखाणीजवळच्या भिंती, दरडी कोसळून आतापर्यंत पाच मजुरांचा बळी गेला आहे. त्यामुळे दगडखाणी बंद करण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सिडकोने काही वर्षांपूर्वी या दगडखाणींचे स्थलांतर उरण भागात करण्याचा निर्णय घेतला होता, पण तेथील डोंगर स्थानिक दगडखाण माफियांनी यापूर्वी पोखरून टाकले आहेत. तेथील ग्रामस्थांचा नवी मुंबईतील दगडखाण मालकांना उद्योग सुरू करण्यास विरोध आहे. त्यामुळे त्या ठिकाणी दगडखाणी स्थलांतरित करण्याचा प्रश्न रद्द करावा लागला. नवी मुंबईतील दगडखाणीवर हजारो कामगार अवलंबून आहेत. याशिवाय दगडखाणीच्या व्यवसायाला जोडव्यवसाय असणारे अनेक उद्योग आहेत. दगडखाणी बंद झाल्यानंतर या सर्वावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे; मात्र नवी मुंबईतील दगडखाण चालकांनी डोंगर उभे पोखरण्यास सुरुवात केल्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. पालकमंत्री गणेश नाईक यांनी या दगडखाणी आता बंद करण्याची गरज अनेक वेळा जिल्हा नियोजन बैठकीत व्यक्त केली आहे. त्याची सुरुवात त्यांनी स्वत:पासून केली असून नातेवाईकांच्या नावावर असणाऱ्या तीन दगडखाणी यापूर्वीच बंद केल्या आहेत. दगडखाणीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून श्वसनाचे अनेक विकार होत असल्याचे उघड झाले आहे. पारसिक डोंगराचा अर्धा भाग उभ्या पद्धतीने पोखरून टाकण्यात आल्याने हे डोंगर ठिसूळ होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कोणत्या उद्योजकाला अपघात व्हावा असे वाटते, असा सवाल उपस्थित करून नवी मुंबई दगडखाण मालक संघटनेचे अध्यक्ष नामदेव ठाकूर यांनी कोणत्या उद्योगात अपघात होत नाही, असा प्रश्न केला. नैसर्गिक आपत्तीमुळे घडलेल्या अपघातांना कोणाला दोषी धरता येणार नाही. सिडकोने नवी मुंबईतील दगडखाणींना २०१६ पर्यंत परवानी दिली आहे. त्याची १७ कोटी रुपये स्वामित्वधन भरण्यात आले आहे. केवळ दगडखाणींचा व्यवसाय आता परवडणारा नाही. त्यामुळे आम्हालाही आता हा व्यवसाय नकोसा झाला आहे, पण योग्य ते पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही या दगडखाणी बंद कशा करायच्या, असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. आमच्या पुढच्या पिढीला आम्ही कोणता व्यवसाय देऊ, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे नवी मुंबईतील दगडखाण व्यवसाय बंद करण्याच्या दृष्टीने सरकारला यात लक्ष घालावे लागणार आहे.