टँकरच्या पाण्यावरून दंगल
पाणीटंचाईची तीव्रता भीषण स्वरूप धारण करीत असतानाच पाण्यासाठी भांडण-मारामारीसारखे प्रकारही वरचेवर घडू लागले आहेत.
टँकरवर पाणी भरण्याच्या कारणावरून शहरातील दर्गा रोड परिसरात दंगल उसळली. या वेळी दोन गटांत सलग अर्धातास जोरदार दगडफेक झाली. यात सात जण जखमी झाले. दंगेखोरांनी परिसरातील गाडय़ांनाही लक्ष्य केले. जखमींमध्ये सहा महिलांचा समावेश आहे.
बुधवारी रात्री नऊच्या सुमारास दर्गा रोड परिसरात पालिकेचे पाण्याचे टँकर आले होते. टँकर कोणत्या ठिकाणी उभे करावयाचे या कारणावरून दोन गटांत हमरीतुमरी झाली. शाब्दिक बाचाबाचीवरून दोन्ही गटांतील तरुणांनी एकमेकांना शिवीगाळ सुरू केली. बाचाबाची सुरू असतानाच दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. सलग अर्धातास दोन्ही गटाकडून जोरदार दगडफेक झाली. त्यामुळे टँकरवर पाणी भरण्यास आलेल्या सहा महिला जखमी झाल्या. एका तरुणासही गंभीर दुखापत झाली. दगडफेकीतील जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना अधिक उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले. परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटांतील ३५जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हाश्मी काझी अहमद हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्या फिर्यादीवरून सचिन देवकते, अशोक देवकते, बालाजी उर्फ बाल्या, पाताळ देवकते, लाला देवकते यांच्यासह इतर ८-१०जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. अशोक गणपत सोलंकर यांच्या तक्रारीवरून २०-२५जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. टँकरवर गल्लीतील महिला पाणी भरत असताना, पाईप आणि घागरी फेकून देत इसाक नाना शेख, सरफरोज शेख, जब्बर शेख, साजिद जावेद शेख, सय्यद अख्तर असिफ, शेख अस्लम अली यांच्यासह इतर २०-२५जणांनी दगडफेक सुरू केली. यात शेषाबाई व्यंकट देवकते, चंद्रकला देवकते, शालू देवकते, कुसूम देवकते, केशरबाई महानवर आणि रुक्मिणी ठवरे या महिलांना दगडफेक करून गंभीर जखमी केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर, निरीक्षक सुरेश घाडगे यांनी स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला. परिसराला पोलीस छावणीचे रुप आले असून दंगेखोरांना पकडण्याचे सत्र सुरू आहे. आठ-दहा जणांना पोलिसांनी गजाआड केले.