वाशी तालुक्यातील हातोला साठवण तलावाच्या निकृष्ट कामास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह पाटबंधारे मंडळ कार्यालयात धुडगूस घातला. कार्यकर्त्यांच्या या खळ्ळखटय़ाक् आंदोलनात दोन्ही कार्यालयांचे मोठे नुकसान झाले.
हातोला तलावात सध्या मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. मात्र, तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने तलावाला गळती लागली आहे. या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी मनसेचे वाशी तालुकाध्यक्ष सचिन इंगोले यांनी १२ ऑगस्टला तलावाच्या िभतीवर उपोषण सुरू केले होते. त्यावेळी अधीक्षक अभियंता कोचेटा व उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी ६ आठवडय़ांत दोषींवर कारवाईचे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले होते. ही मुदत उलटून गेल्यानंतरही संबंधितांवर कसलीही कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकत्रे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले व जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीच्या काचा त्यांनी फोडल्या. कार्यालयात घुसून साहित्याचीही तोडफोड केली. या बरोबरच पाटबंधारे कार्यालयात गोंधळ घालत साहित्याची नासधूस केली. दोन्ही कार्यालयांचे किती नुकसान झाले, याची माहिती मिळू शकली नाही.
शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश घाडगे व सहकाऱ्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. या प्रकरणी मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन इंगोलेसह चारजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता. जिल्हाधिकारी कार्यालयात यापूर्वी अनेकदा मोठय़ा प्रमाणात काही पक्ष, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, कार्यालयाची नासधूस, जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक होण्याची ही बहुधा पहिलीच घटना आहे. त्यामुळे ही घटना घडताच जिल्हाधिकारी कार्यालयात एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे आंदोलनकर्त्यांचा नेमका कोणता उद्देश होता, या विषयीही चर्चा होताना दिसून आली.
महसूल कर्मचाऱ्यांचे बेमुदत लेखणीबंद
जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनावर हल्ल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी उद्यापासून (गुरुवार) बेमुदत लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे. यात राजपत्रित अधिकारी संघटना, राज्य सरकारी कर्मचारी संघटना, जिल्हा नायब तहसीलदार संघटना, राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्यासह विविध संघटनांचा सहभाग आहे.