भंडारा रोड रेल्वे स्टेशन येथे गीतांजली सुपरफास्ट एक्सप्रेस तसेच बिलासपूर-पुणे एक्सप्रेसला थांबा मिळणार असून लवकरच त्याची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा जिल्हा रेल्वे यात्री सेवा समितीच्या  शिष्टमंडळासोबत गोंदिया येथे झालेल्या चर्चेत दिली.  याप्रसंगी शिष्टमंडळाने जिल्हा मुख्यालयात रेल्वे स्टेशन निर्माण करण्यात यावे या मुख्य मागण्यांसह जिल्ह्य़ातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांच्या सोडवणुकीकरिता एक निवेदन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना प्रदान केले. शिष्टमंडळाचे नेतृत्व अध्यक्ष सत्तार खान, सचिव रमेश सुपारे यांनी केले. शिष्टमंडळात उपाध्यक्ष सुरेश फुलसुंगे, सभासद गोविंदराव चरडे, सिलव फुले व विजय खंडेरा यांचा समावेश होता.
  गीतांजली सुपरफास्ट अप व डाऊन व बिलासपूर-पुणे एक्सप्रेसची वेळ ही भंडारा जिल्ह्य़ातील प्रवाशांच्या दृष्टीने सोईची आहे. त्यामुळे भंडारा रोड येथे थांबा देण्याची मागणी होत होती. रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार जिल्हा मुख्यालयात सर्व रेल्वे गाडय़ांना थांबा देण्यात यावा यासाठी रेल्वे संघटना प्रयत्नशील होत्या. तसेच केंद्रीय मंत्री  प्रफुल्ल पटेल हे स्वत: रेल्वे मंत्रालयाशी संपर्कात होते. चर्चेत संघटनेचे रमेश सुपारे यांनी विदर्भकन्या रुक्मिणी गोंदिया-गोवा एक्सप्रेस सुरू करावी, असा आग्रह केला.  केंद्रीय मंत्री पटेल यांना दिलेल्या निवेदनात जिल्हा मुख्यालयात सर्व रेल्वे स्टेशन निर्माण करण्यात यावे या मुख्य मागण्यांसह जिल्ह्य़ातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांच्या सोडवणुकीकरिता प्रयत्न करण्याचा आग्रह करण्यात आला आहे.