वारकऱ्यांचे पालकमंत्र्यांना साकडे
 कल्याणमधील पत्रीपूल ते शीळफाटा, काटई ते बदलापूर-नेवाळी आणि श्रीमलंग रस्ता परिसरात एकूण ४८ डान्सबार, बीअरबार, लॉजिंग-बोर्डिगची दुकाने आहेत. राज्य शासनाने महामार्गालगतची सर्व दारूविक्री करणारी हॉटेल्स बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आता डोंबिवली परिसरातील हा छमछम व्यवसाय कधी बंद होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. पालकमंत्री गणेश नाईक यांनी शीळफाटा परिसरातील दारूदुकान बंदीवर स्वत: लक्ष घालावे, अशी या भागातील वारकरी मंडळींची मागणी आहे.
गेल्या काही वर्षांपासून कल्याणजवळील पत्रीपूल ते शीळफाटा रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत बीअरबार, डान्सबार तसेच पिकअप-पॉइंट सुरू करण्यात आले आहेत. या व्यावसायिकांकडून शासनाला किती महसूल मिळतो हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील मनोरंजन विभाग यांच्या आशीर्वादाने हा व्यवसाय गेली अनेक वर्षे सुरू आहे. काटई नाका ते बदलापूर पाइपलाइन रस्त्याच्या दुतर्फा हे डान्सबार, पिकअप-पॉइंट बेकायदेशीरपणे सुरू आहेत. कल्याण ते श्रीमलंग रस्त्याच्या दुतर्फा तीच परिस्थिती आहे. फोफावलेला अनधिकृत बांधकाम व्यवसाय, जमिनींचे व्यवहार, वाढता बांधकाम व्यवसाय यामुळे या क्षेत्रातील बहुतेक मंडळी दररोज संध्याकाळी ‘श्रमपरिहारा’साठी या निवांत ठिकाणी विसाव्यासाठी येत असल्याने बाराही महिने ही छमछम जोरात सुरू असल्याची माहिती आहे.
समोरच्या बाजूला बीअरबारचा फलक लावायचा. पाठीमागे लॉजिंग-बोर्डिग सुरू करायचे. त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालवायचा अशा पद्धतीने हे बहुतेक बार सुरू असल्याची माहिती आहे. मानपाडा पोलिसांच्या अखत्यारीत हे भाग येत आहेत. वरिष्ठांपासून शीळफाटा परिसराला आशीर्वाद असल्याने या ‘सुरक्षित झोन’मध्ये कोणीही या आणि काहीही करा असा प्रकार सुरू आहे.