आपला देश भ्रष्टाचारमुक्त झाला पाहिज, तो सशक्त व बलवानही झाला पाहिजे. या देशातील शेतकरी, व्यापारी आणि गृहिणी सुखी झाल्या पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणे अत्यावश्यक आहे. लोकशाही आणि देश सुदृढ करण्यासाठी लोकसभेत शंभर टक्के मतदान झाले पाहिजे. या मतदानातून प्रामाणिक, सज्जन व लोकांचे जीवन समृध्द करणारे राज्यकर्ते सत्तेत आले पाहिजे, असे भावपूर्ण प्रतिपादन आध्यात्मिक गुरू व आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री श्री रविशंकरजी यांनी येथे केले. ते येथील लहाने लेआऊट परिसरात उभारण्यात आलेल्या नंदग्राममध्ये सत्संग प्रसंगी बोलत होते.
रविशंकर म्हणाले की, ज्या ठिकाणी आध्यात्माची शक्ती प्रचंड असते त्याठिकाणी बहुधा नैसर्गिक आपत्ती येत नाही. आपण आपल्या शरीराला व अंत:करणाला ओळखले पाहिजे. दुसऱ्यावर प्रेम करणे, प्रत्येकाचे कल्याण होण्याची भावना जोपासणे ही आध्यात्माची पहिली पायरी आहे. ती आपण शिकून घेतली पाहिजे. आपला देश जगातील सर्वश्रेष्ठ देश आहे. दुनियेच्या पाठीवर एवढा संस्कृतीसंपन्न दुसरा कोणताच देश नाही. असे असतांना देशातील भ्रष्टाचार, गैरव्यवहार, घोटाळे, दुराचार, अन्याय, अत्याचार पाहिले की, अंत:करणाला वेदना होतात. हे सर्व वाईट संपून चांगले व पवित्र विश्व निर्माण झाले पाहिजे. ऋषिकुलात व आचार्य परंपरेत जातीभेदाला अजिबात थारा नाही. सर्व एक समान व परमेश्वराची लेकरे आहेत. रामायणाचे निर्माते महर्षि वाल्मीकी हे दलित समाजात जन्माला आले असले तरी सर्व श्रेष्ठ ऋषी होते. त्यामुळे ऋषी हे कर्तृत्वाने महान असतात. आपल्या देशातून जगात सर्वात मोठय़ा प्रमाणात गोमांस निर्यात होते. ही फार वेदनादायक बाब आहे. देशातील गोहत्या संपूर्णपणे संपल्या पाहिजेत. भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा या देशात १३० कोटी पशुधन होते, तर ३० कोटी लोकसंख्या होती. आता उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. १२० कोटी लोकसंख्या, तर २० कोटी पशुधन आहे. परिस्थिती अशीच राहिली तर दूध हा कागदावर लिहिण्या पुरता शब्द राहील. आपल्याला परदेशातून दूध आयात करावे लागेल. तेव्हा गोहत्या थांबल्याच पाहिजे.
रविशंकर यांनी रॅम्पवर फिरून उपस्थित भक्तांशी तासभर सुसंवाद साधला व प्रवचन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या बुलढाणा शाखेने या सत्संगाचे आयोजन केले होते. प्राचार्य वसंतराव सावळे, चंदूभाऊ पैठणे, नांदरे, देवरे, मोरे, सुरेश चौधरी, रवी पाटील, गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. लोकसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमिवर रविशंकरजी काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यांनी कुणाला मतदान करावे, याबद्दल स्पष्ट काहीच सांगितले नाही. भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव, शिवसेनेचे आमदार विजयराज शिंदे, अपक्ष उमेदवार बाळासाहेब दराडे यांनी त्यांचे दर्शन घेतले. देश महान करणारे राज्यकर्ते हवेत, असे ते म्हणाले.