गेल्या काही वर्षांमध्ये महिला रेल्वे प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांतील लक्षावधी महिला रोज कामानिमित्त रेल्वेने प्रवास करतात. आठवडय़ात कोणत्याही दिवशी सकाळी कोणत्याही रेल्वे स्थानकावर चक्कर मारल्यास महिला डब्यांसमोरील गर्दी पाहिल्यानंतर कोणाच्याही छातीत धडकी भरावी, एवढी ही संख्या वाढली आहे. महिलांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात तरी महिलांसाठी डब्यांचे प्रमाण वाढवावे, अशी मागणी महिलांकडून होऊ लागली आहे.
महिला डब्यांची संख्या
सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर १२ डब्यांमध्ये चर्चगेट आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेचा एक डबा महिलांसाठी राखीव आहे. या डब्यातील एक कंपार्टमेण्ट लगेज अर्थात सामानासाठी दिला आहे. त्याशिवाय मध्यभागी असलेला सहावा डबाही मध्य रेल्वेवर महिलांसाठीचा आहे. तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेटपासून चौथा डबा महिलांसाठी आहे. १२ डब्यांच्या गाडीतील दहावा डबा दोन्ही रेल्वेमार्गावर महिलांसाठी आहे. त्याशिवाय प्रथम श्रेणी वर्गातील डब्यांमध्ये एक एक छोटा कंपार्टमेण्ट महिलांसाठी राखीव आहे.
महिलांसाठीचे ‘आरक्षण’!
रेल्वेने कधीकाळी केलेल्या पाहणीप्रमाणे आणि नियमांप्रमाणे रेल्वेच्या एकूण डब्यांच्या संख्येपैकी २२ टक्के संख्या महिलांसाठी ठेवण्यात आली आहे. १२ डब्यांच्या एका गाडीची आसनक्षमता २६०० आहे. त्यापैकी २२ टक्के म्हणजे सुमारे ५०० आसने महिलांसाठी राखीव आहेत. प्रत्यक्षात या गाडीतून गर्दीच्या वेळी पाच हजारांपेक्षाही जास्त लोक प्रवास करतात. त्यात महिलांची संख्या १२००-१५००च्या आसपास असते. महिलांसाठीच्या आसनक्षमतेत प्रथम श्रेणी वर्गातील डब्यांचाही समावेश आहे. देशभरात महिलांना इतर क्षेत्रांमध्ये ३३ टक्के आरक्षण मिळत असताना रेल्वे प्रवासातही ते का मिळू नये, असा प्रश्न प्रवासी संघटना उपस्थित करीत आहेत.
महिलांच्या समस्या
महिलांच्या डब्यांची संख्या कमी असल्याने ठाणे, डोंबिवली, अंधेरी, बोरिवली, मुलुंड, कल्याण, दादर, लोअर परळ, वांद्रे, विलेपार्ले अशा अनेक स्थानकांवर गर्दीच्या वेळी महिलांची झुंबड उडते. त्यातच प्लॅटफॉर्म आणि रेल्वे डबा यातील उंची जास्त असल्याने महिलांना डब्यात चढणे कठीण जाते. त्यामुळे अनेकदा महिला गाडी सुटताना चढण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यामुळे अनेकदा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. साधारण डब्यांमध्ये पुरुष प्रवाशांची गर्दी असल्याने त्या डब्यातून प्रवास करणे शक्य नसते. त्यामुळे महिलांना अनेकदा गाडय़ा सोडाव्या लागतात.
‘फर्स्ट क्लास’ मनस्ताप
आरामदायक आणि कमी गर्दीचा प्रवास घडावा, यासाठी प्रथम श्रेणीचा मासिक पास किंवा तिकीट काढणाऱ्या महिला चांगल्याच पस्तावतात. प्रथम श्रेणी डब्यांमध्ये महिलांच्या वाटय़ाला फक्त एक कंपार्टमेण्ट रेल्वेने राखून ठेवले आहे. गेली अनेक वर्षे पूर्ण गाडीत अशी फक्त तीन कंपार्टमेण्ट्स महिलांच्या वाटय़ाला आहेत. प्रथम दर्जाच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या गेल्या काही वर्षांत चांगलीच वाढली असली, तरी या डब्यांची क्षमता मात्र तेवढीच आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रथम दर्जाच्या महिलांच्या डब्यात शिरणे हे कष्टाचे असते, असे अनेक महिलाच सांगतात.
विशेष म्हणजे, महिला विशेष!
गर्दीच्या वेळी महिलांना आरामदायक प्रवास करता यावा, यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने महिला विशेष फेऱ्या सुरू केल्या. मध्य रेल्वेवर सकाळी आणि संध्याकाळी अशा फक्त दोनच महिला विशेष फेऱ्या आहेत. या फेऱ्यादेखील कल्याणहून मुंबई आणि मुंबईहून कल्याण अशा धावतात. कल्याणच्या पुढे आसनगाव, बदलापूर या स्थानकांवर उतरणाऱ्या महिलांचा याबाबत विचार करण्यात आलेला नाही. त्यामानाने पश्चिम रेल्वेवर महिलांसाठी आश्वासक परिस्थिती आहे. पश्चिम रेल्वे सकाळी चार आणि संध्याकाळी चार महिला विशेष गाडय़ा चालवते. या गाडय़ा बोरिवली, विरार, भाइंदर आणि वसई रोड या चार स्थानकांसाठी आहेत. त्यामुळे महिलांची गर्दी चांगलीच विभागली जाते आणि त्याचा फायदा महिलांना होतो. पश्चिम रेल्वेच्या धर्तीवर मध्य रेल्वेवरही कल्याण, बदलापूर आणि आसनगाव येथे जाणाऱ्या आणि येथून सुटणाऱ्या अशा दिवसात सहा फेऱ्या सोडाव्यात, अशी मागणी महिलांनी केली आहे.
नजीकच्या काळात बदल नाहीच
रेल्वे प्रशासन महिलांच्या डब्यांची संख्या वाढवताना पुरुष व महिला प्रवासी यांच्या संख्येचे प्रमाण लक्षात घेते. त्याचप्रमाणे मध्यंतरी १५ डब्यांची गाडी आल्यानंतर त्यात आम्ही महिला प्रवाशांच्या दृष्टीने अधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात तरी सध्या असलेल्या स्थितीत काहीच बदल होणार नाही. महिला विशेष गाडय़ांच्या बाबतही फेऱ्या वाढवण्याचा निर्णय झाल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल.
– अतुल राणे,
मुख्य जनसंपर्क अधिकारी (मध्य रेल्वे)