मंत्री नाही म्हणून काय झाले, खासदार तर आहे ना?
 कोणी टॉवेल देता का हो टॉवेल?

‘आता मंत्री नाही म्हणून काय झाले? खासदार तर आहे ना,’ असा सवाल करीत ‘अरे बाबा, निदान टॉवेल आणि साबणाचा तुकडा तर द्या रे,’ असे विश्रामगृहातील कर्मचाऱ्याला म्हणण्याचा प्रसंग सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळात सामाजिक न्यायखात्याचे राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या माणिकराव गावित यांच्यावर आला होता. त्यांनी यवतमाळात अनुभवलेल्या या घटनेचीच सध्या राजकीय वर्तुळात मजेदार चर्चा आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या यु.पी.ए.२ सरकारात मंत्री झाल्यावर माणिकराव गावित यवतमाळात आयोजित भव्य राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आले होते. तेव्हाचे शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी हे प्रदर्शन आयोजित केले होते. मंत्री असल्याने शासनाने ठेवलेली बडदास्त आणि सेवेचा झगमगाट पाहून माणिकराव गावित प्रसन्नचित्त होते. गंमत म्हणजे, काही दिवसांनीच नंतर गावितांचे मंत्रिपद गेले. ‘माजी मंत्री’ झाल्यावरही माणिकराव गावितांचा एक कार्यक्रम दीनबंधू संस्थेच्या सुनील आणि नितीन सरदार बंधूंनी यवतमाळातच आयोजित केला होता. त्या वेळी गावित नवीन शासकीय विश्रामगृहाच्या कक्ष क्र. २ मध्ये थांबले होते, पण त्या कक्षात साधा टॉवेलच काय पण साबणही नव्हते.
गावितांकडे कर्मचाऱ्यांनी पूर्णत: दुर्लक्ष केले तेव्हा गावित एका कर्मचाऱ्याला विनयाने म्हणाले, ‘अरे बाबा, आता मी मंत्री नाही म्हणून काय झाले? खासदार तर आहे ना? विश्रामगृहाच्या या कक्षात बाकी काही देऊ नका. निदान एक टॉवेल व साबण तरी द्या रे.’ ही बाब जिल्हाधिकारी संजय देशमुख यांना समजली तेव्हा त्यांनी विश्रामगृहाचा प्रमुख कर्मचारी वसंता याला तात्काळ निलंबित केले होते. मंत्री असतानाचा झगमगाट, सरबराई व बडदास्त माणिकराव गावितांनी यवतमाळात अनुभवली होती आणि मंत्री नसतानाची ‘अदखलपात्र’ अवस्थाही यवतमाळातच सहन केली. उल्लेखनीय म्हणजे, निलंबित केलेल्या कर्मचाऱ्याचे निलंबन मागे घेण्याची विनंतीही गावितांनी करून मनाचा मोठेपणा दाखवला होता.
विशेष बाब ही की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या युपीए-१ सरकारात पहिल्यांदा गावित मंत्री झाले तेव्हा ते आपल्या नंदुरबार मतदारसंघातील घरी दूरदर्शनवर बातम्या पाहात होते आणि आपला मंत्रिमंडळात समावेश झाल्याचेही या बातम्यांमधूनच त्यांना समजले. हा किस्सा स्वत: माणिकराव गावित यांनी यवतमाळात ‘लोकसत्ता’ला सांगितला होता. ७९ वर्षीय आदिवासी नेते माणिकराव गावित यांना खासदारकीचा ३० पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. सध्या त्यांची लोकसभेतील नववी टर्म सुरू आहे. १९६५ मध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून राजकारणात आलेल्या गावितांनी ३० वर्षांच्या आपल्या खासदारकीच्या काळात साधी राहणी सोडली नाही. खादीचा रुंद पायघोळचा पायजमा, तसाच सदरा, त्यावर कोट आणि डोक्यावर टोपी हा ‘अवतार’ कधी बदलला नाही. मंत्री होण्याचा आनंद नाही आणि मंत्रिपद गेल्याचे दु:ख नाही, अशा स्थितप्रज्ञ वृत्तीने वागणारे माणिकराव गावित काही आरोपांचेही धनी झाले होते. मात्र, सीबीआयने त्यांना चौकशीअंती ‘क्लीन चिट’ दिली होती.
त्यांच्या नंदुरबार या मतदारसंघातूनच काँग्रेसने अनेकदा निवडणूक प्रचाराची सुरुवात केली आहे. सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी आधार कार्ड कार्यक्रमाचे उद्घाटनही गावितांच्या नंदुरबार येथूनच केले होते.