जगातील विविध धर्मामध्ये आणि संस्कृतींमध्ये अनेक वनस्पतींना पिढय़ान् पिढय़ा पवित्र मानले गेले आहे. याच वनस्पती एका ठिकाणी लावून त्यांचे राष्ट्रपती भवनात एक खास उद्यान तयार करण्यात आले आहे. ‘पृथ्वीतलावरील पवित्र वनस्पती उद्यान’ असे या उद्यानाचे नाव असून, त्याच्या उभारणीत महत्त्वाचा वाटा असणाऱ्या डॉ. नलिनी यांनी सोमवारी उद्यानाच्या निमिर्तीची कथा उलगडली.
 माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या कारकिर्दीत या उद्यानाची स्थापना करण्यात आली होती. टिळक स्मारक मंदिर येथे ‘महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी’ आयोजित एका कार्यक्रमात डॉ. नलिनी यांनी या उद्यानाच्या निर्मितीमागचे कारण स्पष्ट केले. वेगवेगळ्या धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या वनस्पतींचे एकत्रीकरण या उद्यानात केलेले आहे. त्यासाठी भारताच्या विविध कोपऱ्यांतून वनस्पती आणल्या गेल्या आहेत. खजूर, रुद्राक्ष आणि ऑलिव्हसारख्या दुर्मिळ वनस्पतीही या उद्यानात आहेत. वनस्पतींच्या रूपात असलेली संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी हाही या उद्यानाच्या निर्मितीमागचा उद्देश आहे. हिंदू, शिख, ख्रिस्ती, मुस्लिम आणि बौद्ध धर्मात पवित्र आणि औषधी असलेल्या काथ, पळस, कमळ,  बकुळ, पिंपळ, ब्राह्मी, चाफा, केळे, डाळिंब, खजूर, द्राक्ष, आर्यन वुड ट्री आणि साल वृक्ष यांसारख्या अनेक वनस्पती येथे बघायला मिळतात. त्वचा रोग, मूत्रपिंडाचे आजार, रक्तशुद्धीकरण, दंतरोग, संधिवात, मधुमेह यांसारखे अनेक आजार बऱ्या करणाऱ्या कडुलिंब, गुलाब, बांबू, कांदा, लसूण, औदुंबर, तुळस, रिठा, जास्वंद, अशोक, या वनस्पती या उद्यानात लावण्यात आल्या आहेत. वर्षभरात लाखो लोक या उद्यानाला भेट देतात, अशी माहिती डॉ. नलिनी यांनी दिली. काश्मीरमधील नेहरू उद्यानातही हा पवित्र वनस्पतींचा उपक्रम राबवण्यात आला आहे.