औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांत सरळ होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सुभाष झांबड व किशनचंद तनवाणी हे दोनच उमेदवार रिंगणात असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.
छाननीदरम्यान देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला होता. उर्वरित उमेदवारांनी सोमवारी अर्ज मागे घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अभिजित देशमुख यांचा अर्ज कायम राहतो की काढून घेतला जातो, या विषयी उत्सुकता होती. त्यांनी अर्ज मागे घेतल्याने ही लढत दोन प्रमुख उमेदवारांतच होणार आहे. संख्याबळ लक्षात घेता तिसरा व्यक्ती असता तर घोडेबाजाराचे आकडे फुगले असते. उमेदवार निश्चितीनंतर ‘दर’ घसरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास काँग्रेसमधून बरेचजण इच्छूक होते. अनेकांनी त्यासाठी दिल्लीवारी केली. मुंबईला हेलपाटे घातले. काही उमेदवार तर एवढे गुडघ्याला बाशिंग बांधून उभे होते की, त्यांनी उमेदवारी मिळावी या साठी वरिष्ठ नेत्यांना पायघडय़ा घातल्या. माहितीच्या मोठ-मोठय़ा वैयक्तिक तपशिलाची कागदपत्रेही प्रकाशित करण्यात आली. शिवसेनेकडून तनवाणी यांचे नाव पूर्वीच निश्चित केले होते. खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार बैठक घेऊन ते घोषित केले. लढत तिरंगी झाली तर तनवाणी ‘करिष्मा’ दाखवतील, असेही शिवसेनेकडून सांगितले जात होते. अखेपर्यंत तिसरा उमेदवार निवडणुकीत असावा, या साठी प्रयत्न केले गेले. मात्र, शिवसेनेला यश आले नाही. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने काँग्रेसला सहकार्य करण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली. या मतदारसंघात ४७१ मतदार आहेत.