26 September 2020

News Flash

शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचे कळप

मोकाट जनावरांच्या कळपांमुळे शहराच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहे. मोकाट जनावरांना पडकण्याची मोहीम महापालिकेने मधल्या काळात हाती घेतली असली तरी

| September 20, 2014 12:27 pm

मोकाट जनावरांच्या कळपांमुळे शहराच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहे. मोकाट जनावरांना पडकण्याची मोहीम महापालिकेने मधल्या काळात हाती घेतली असली तरी रस्त्यांवर फिरणाऱ्या जनावरांची संख्या मात्र कमी झालेली नाही. जनावरे पकडण्यासाठी गेलेल्या पथकांवर हल्ले होत असल्याने कर्मचारीही यापासून स्वत:ला दूर ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे रस्त्यांवरील जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढला असताना महापालिकेत आणि नगरसेवकांकडे या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असल्या तरी कारवाई मात्र होताना दिसत नाही. शहरातील महामार्गावरील आणि वेगवेगळ्या वस्त्यांमधील रस्त्यांवर तर जणू काही ठिकाणी जनावरांचे साम्राज्य असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. बडकस चौक ते अयाचित मंदिर या मार्गावर एक महाविद्यालयीन विद्यार्थी मोकाट जनावर रस्त्यावर आडवे आल्याने पडून गंभीर जखमी झाला. अजनी ते मेडिलक चौक या मार्गावर जनावरे रस्त्यावर असल्यामुळे अनेकदा वाहतूक खोळंबते. जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेले असतात. त्यामुळे अनेकदा अपघात होतात. शहरात गेल्या दोन वर्षांत जनावरांमुळे ३ जण मृत्युमुखी पडले तर अनेक जण जखमी झाल्याची नोंद आहे.
जनावरांचे मालक सकाळच्यावेळी त्यांना मोकळे सोडून देतात. त्यांना पकडण्यासाठी मात्र महापालिकेचे पथक पोहचत नाही. अनेकदा महापालिकेच्या पथकांना कळविल्यानंतर ते जनावरे पकडण्यासाठी येतात तर त्यांच्यावर जीवघेणे हल्ले करण्यापर्यंत या पशुमालकांची मजल गेली आहे. शहरातील विविध भागात जनावरांचा कळप नेहमीच रस्त्यांवर उभे किंवा बसलेले असतात. ‘ट्रॅक्टर’ घेऊन महापालिकेच्या कोंडवाडा विभागाचे कर्मचारी निघतात. मात्र, त्यांना जनावरे सापडत नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे या अगदी किरकोळ वाटणाऱ्या पण गंभीर समस्येपासून सुटका काही होत नाही. पावसाळ्याच्या दिवसात मोठय़ा प्रमाणात मोकाट जनावरे रस्त्यांवर येण्यास अनेक मतप्रवाह आहे. काहींच्या मते गोठय़ात पावसाळ्यात चिखल आणि माश्यांचा त्रास होत असल्याने ते रस्त्यांवर ठाण मांडतात. मात्र, गेल्या काही दिवसात पाऊस नाही तरीही जनावरे रस्त्यावर बसलेली दिसतात. आठवडी बाजार, फुल बाजार परिसरात वर्षभर मोकाट जनावरांचा सुळसुळाट असतो. परंतु, कोंडवाडा विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा बंदोबस्त करता आलेला नाही. याचे परिणाम वाहनचालकांना भोगावे लागत आहेत.
या संदर्भात आरोग्य विभागाचे सभापती रमेश सिंगारे यांनी सांगितले. तीन महिन्यांपूर्वी शहरात जनावरे पकडण्याची मोहीम सुरू केली होती. त्यावेळी अनेक जनावरांची  कोंडवाडय़ामध्ये रवानगी करण्यात आली होती. मात्र, पुन्हा ही कारवाई सुरू करणार आहे. ज्या मालकांची जनावरे वारंवार रस्त्यावर पकडली जात असतील अशा जनावरांच्या मालकांकडून दुप्पट दंड वसूल केला जाईल, असेही सिंगारे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 12:27 pm

Web Title: street cattle flocks on the road of the city
Next Stories
1 राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर ‘अभ्यास दौरे’
2 बसप विधानसभेच्या सर्व जागा लढणार
3 राष्ट्रीय शिक्षक संसद २६ सप्टेंबरपासून
Just Now!
X