News Flash

पथदिवे बंद : रोडपालीतील नागरिकाची ‘अंधारी वाटचाल’

सिडको विकासकांच्या साह्य़ाने कळंबोली येथील सेक्टर १७ ते २० या परिसरात रोडपाली नोड ही नवीन वसाहत वसविली आहे. मात्र या परिसरात शीव-पनवेल मार्गावरील पथदिवे बंद

| March 27, 2014 08:50 am

सिडको विकासकांच्या साह्य़ाने कळंबोली येथील सेक्टर १७ ते २० या परिसरात रोडपाली नोड ही नवीन वसाहत वसविली आहे. मात्र या परिसरात शीव-पनवेल मार्गावरील पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारात मार्गक्रमण करावे लागत आहे. अंधाराचा फायदा घेत लूटमारीचे प्रकार वाढले आहेत. या वाढत्या घटनांमुळे रात्री उशिरा घरी येणारा नोकरवर्ग धास्तावला आहे. या परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने नोकरदारवर्गाला रात्रीच्या वेळी घरी परतताना पुरुषार्थ पंप ते रोडपाली नोड हा एक किलोमीटरचा पल्ला इच्छा नसतानाही चालावा लागतो. दिवसभरात खारघर रेल्वेस्थानक ते रोडपाली दरम्यान तुरळक प्रमाणात असलेल्या खासगी वाहनांनी  प्रवासाचे दिव्य नागरिक पार पाडतात. मात्र रात्री साडेसातनंतर ही खासगी वाहने या परिसरात फिरकत नाहीत. सध्या पुरुषार्थ पंपापासून ते रोडपाली लिंकरोडचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे रस्त्यावरील पथदिवे बंद पडले आहेत.  तीन महिन्यांपूर्वी या परिसरात एका वृद्ध दाम्पत्यासोबत त्यांच्या मुलीला चोरटय़ांनी मारहाण करून लुटले होते. पोलिसांनी या चोरटय़ांना मुंब्रा, ठाणे येथून अटक केली होती. या लूटमारसत्राची पुनरावृत्ती झाल्याशिवाय सिडको प्रशासन जागे होणार नाही का, असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे. लिंकरोडची कामे सुरू असताना तात्पुरती विजेची सोय करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. याबाबत सिडकोचे वीज विभागाचे कार्यकारी अभियंता पी. बी. ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत लवकरच उपाययोजना करण्यात येईल, असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 8:50 am

Web Title: street light not working in panvel
Next Stories
1 दास्तान ते गव्हाणफाटा दरम्यान अनधिकृत पार्किंग
2 मावळ लोकसभा निवडणुकीसाठी उरणमध्ये प्रचार कार्यालयांच्या उद्घाटनांचा धडाका
3 नेरुळ उड्डाणपुलावर कंटेनरला आग
Just Now!
X