निवडणूक प्रचारासाठी पथनाटय़ासारखी पारंपरिक प्रचारसाधने आजही उपयुक्तता आणि अस्तित्व टिकवून आहेत. तुरळक प्रमाणात का होइना मात्र निवडणूक प्रचारात, विशेषत: ग्रामीण भागात, आजही पथनाटय़ाचा वापर केला जात आहे.  
पथनाटय़ासारख्या जुन्या व पारंपरिक प्रचारमाध्यमाचा वापर, प्रामुख्याने सामाजिक चळवळींमध्ये, सातत्याने होत आहे. राजकीय प्रबोधन आणि निवडणूक प्रचाराकरिता पथनाटय़ाचा वापर कमी  झाला असला तरी ग्रामीण भागातील या माध्यमाची उपयुकतता टिकून आहे. अमरावती जिल्हयातील बडनेरा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पथनाटय़ाचा वापर करीत आहे. शहरी व ग्रामीण असा मिश्र तोंडवळा असलेल्या या मतदारसंघात दोन्ही भागात पक्षाने पथनाटय़ाद्वारे मतदारांशी संपर्क सुरु केला आहे.  अमरावती शहर भाजपच्या सांस्कृतिक शाखेतर्फे  हे पथनाटय़ सादर केले जात आहे. भाजपच्या प्रचार मोहिमेतील माहिती, विरोधी उमेदवाराचे कच्चे दुवे, मतदारसंघातील महत्त्वाने प्रश्न आणि पक्षाच्या उमेदवाराची बलस्थाने यांवर पथनाटय़ातून प्रकाश टाकला जात आहे. ७-८ लोकांचे पथक असून साधारण १५ मिनिटांचे सादरीकरण केले जाते.