छेडछाडीवरून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन गटांत गेल्या काही दिवसांपासून असलेल्या कुरबुरीचे रूपांतर हाणामारीत झाले. एका दलित तरुणास बेदम मारहाण करून गटारीत फेकून देण्यात आले. त्यानंतर जमावाने एका दुकानाची मोडतोड केली. त्यामुळे कारेगाव येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रमुख कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित केली.
कारेगाव येथे मागील आठवडय़ात दोघांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर दोन गटांत वातावरण आणखी बिघडले. प्रफुल्ल प्रभाकर बारसे (वय २४) या तरुणाने छेडछाड करणाऱ्या एका गटाला जाब विचारला. त्यामुळे १० ते १५ मोटारसायकलवर एक टोळके गावात लाठय़ाकाठय़ा घेऊन दहशत निर्माण करीत फिरत होते. बुधवारी बारसे व पप्पू गायकवाड या दोघांना प्रशांत राजेंद्र उंडे, जालिंदर मच्छिंद्र उंडे, विशाल प्रकाश उंडे, सुशील उंडे यांनी त्यांना मारहाण केली. प्रफुल्ल बारसे याच्या डोक्यात लोखंडी गज घालून जखमी करण्यात आले. त्यास गटारीत फेकून देण्यात आले. औषधोपचारासाठी बारसे यास साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर गावातील दलित समाजात संताप व्यक्त करण्यात आला. नाताळनिमित्त समाजाचे लोक सण साजरा करीत होते. त्याच वेळी काही टारगट मुलांनी दहशत निर्माण केली. त्यामुळे दलित समाज संतप्त झाला. एक हजारहून जास्त महिला व तरुणांनी येऊन राजेंद्र उंडे यांच्या दुकानाची मोडतोड केली. या वेळी बाजार समितीचे सभापती दीपक पटारे, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे व जालिंदर होले यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे शांतता प्रस्थापित झाली. गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गावात तणावाचे वातावरण आहे.
तालुका पोलीस ठाण्यात भूषण बारसे यांनी फिर्याद दिली असून प्रशांत उंडे, जालिंदर उंडे, विशाल उंडे, सुशील उंडे यांच्याविरुद्ध मारहाणप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष भीमा बागूल, महेंद्र गायकवाड यांनी दलित कार्यकर्त्यांची भेट घेतली. पोलीस निरीक्षक कैलास फुंडकर यांची भेट घेऊन गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी केली. फुंडकर यांच्या उपस्थितीत सभापती पटारे तसेच विजय बारसे, राजू बारसे, सचिन लांडगे, राकेश बारसे, वसंत नागुडे, दीपक पटारे आदींमध्ये चर्चा होऊन गावात शांतता ठेवण्यावर निर्णय घेण्यात आला. मारहाण करणारे आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मुले आहेत. अशोकच्या एका माजी संचालकाच्या मुलाचा त्यात समावेश आहे. गुन्हेगारावर कारवाई झाली नाही तर रिपब्लिकन पक्ष आंदोलन करील, असा इशारा देण्यात आला आहे.