07 June 2020

News Flash

पोलिसी खाक्याचा उपनिरीक्षकालाच दणका!

माझ्यावर गुन्हा दाखल होईल, मला अटक होईल.. मी तुरुंगात जाईन.. मसिना रुग्णालयाच्या मानसिक विभागात उपचार घेत असलेला एक रुग्ण सतत हे वाक्य बडबडतोय.. हा कोणी

| April 29, 2015 07:24 am

माझ्यावर गुन्हा दाखल होईल, मला अटक होईल.. मी तुरुंगात जाईन.. मसिना रुग्णालयाच्या मानसिक विभागात उपचार घेत असलेला एक रुग्ण सतत हे वाक्य बडबडतोय.. हा कोणी गुन्हेगार नसून ऐन पंचविशीतला उमदा तरुण पोलीस उपनिरीक्षक आहे..
पंढरपूरच्या सधन शेतकरी कुटुंबातला एक तरुण पोलीस दलात भरती होण्यासाठी मोठी स्वप्ने घेऊन मुंबईत आला. दोन वर्षांपूर्वी तो पोलीस दलात रुजू झाला. दक्षिण मुंबईतील एका पोलीस ठाण्यात सध्या तो पोलीस उपनिरीक्षकपदावर कार्यरत आहे. मात्र पोलीस दलातील कामाचा ताण, वरिष्ठांकडून होणाऱ्या मुस्कटदाबीमुळे तो पुरता खचला. काही दिवसांपूर्वी एका प्रकरणात दोन भावांनी एकमेकांविरोधात तक्रार केली होती. तो अदखलपात्र गुन्हा होता. परंतु त्यातील एका भावाने अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे जाऊन या पोलीस उपनिरीक्षकाविरोधातच तक्रार केली. त्यामुळे या पोलीस उपनिरीक्षकाला धारेवर धरून त्यालाच नोटीस बजावण्यात आली. खोटा गुन्हा मी दाखल करणार नाही, असे सांगितले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने त्याच्यावर आगपाखड करत दमदाटी केली. त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला आणि त्याचे मानसिक संतुलन बिघडले. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला त्वरित जेजे रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला भायखळ्याच्या मसिना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या मसिना रुग्णालयाच्या मानसोपचार विभागातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
२३ एप्रिल रोजी त्याचा वाढदिवस होता. त्याचे सहकारी रुग्णालयात त्याच्यासाठी केक घेऊन गेले. पण तो एकसारखा माझ्यावर गुन्हा दाखल होईल, मी तुरुंगात जाईन एवढेच वाक्य बडबडत होता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. या पोलीस उपनिरीक्षकाचे सहकारी त्याची अवस्था पाहून हवालदिल झाले आहेत. त्याचं करिअर कसं होणार, त्याचं लग्न कसं होणार याची त्यांना चिंता भेडसावतेय.
मुंबई पोलीस दल सध्या तणावग्रस्त झाले आहे. मागील आठवडय़ात अंबोली पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू राठोड (३५) याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. गेल्या वर्षांत म्हणजे २०१४ साली मुंबई पोलीस दलातील १४९ पोलिसांचा सेवेत असताना विविध आजारांनी मृत्यू झाला होता. त्यापैकी ४१ जणांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षकाला सरासरी २० प्रकरणांचा तपास करावा लागतो. त्याशिवाय बंदोबस्त आणि इतर कामो असतात. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होत असतो.

जो प्रामाणिकपणे काम करतो त्याची अशी अवस्था होते. वरिष्ठांकडे कुणी तक्रार केली की सरळ आमच्यावर खापर फोडून मोकळे होतात. आधीच कामाचा ताण त्यात वरिष्ठांचा जाच यामुळे सतत प्रचंड मानसिक दबाव असतो.
एक पोलीस

ताण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न
पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. काम खूप असले तरी व्यवस्थित नियोजन केले तरी खूप फरक पडेल. हवालदार आणि रात्रपाळीचा पोलीस हवालदार यांच्याकडे तपासाचे अधिकार असतात. त्यांना अदखलपात्र गुन्हे, अपमृत्यूची प्रकरणे आदींचा तपास सोपवला तर कामे कमी होतील. परंतु कामचुकार प्रवृत्तीमुळे असे होताना दिसत नाही. पोलिसांना वर्षांला २० पेड सुट्टय़ा आणि १२ सर्वसाधारण सुट्टय़ा असतात. तसेच त्यांना साप्ताहिक सुट्टय़ा नियमित दिल्या जाव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यासाठी शिबिरे, योगा आदींचेही आयोजन केले जाते.
डॉ. धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2015 7:24 am

Web Title: stress on mumbai police
Next Stories
1 मुंबईकरांची चित्रे कोरियाच्या कलाप्रदर्शनात
2 तृतीयपंथी विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र विश्रांतिगृहांची सोय करा
3 ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळ्या सक्रिय
Just Now!
X