व्यापाऱ्यांमध्ये दोन गट
राज्य शासनाने राज्यातील विविध महापालिकावर लादलेल्या एलबीटी कराच्या विरोधात नाग विदर्भ चेंबर ऑफ क़ॉमर्स आणि एलबीटी संघर्ष विरोधी संघर्ष समितीने गेल्या चौदा दिवसांपासून पुकारलेला बंद कायम ठेवल्यामुळे शहरातील मुख्य बाजारापेठशिवाय शहरातील चिल्लर विक्रेत्यांची व्यापारी प्रतिष्ठाने कमी- अधिक प्रमाणात बंद होती. गांधीबाग, पाचपावली भागात रस्त्यावर टायर जाळून व्यापारांनी ‘रस्ता रोको’ आंदोलन केले तर भंडारा मार्गावरील दुकानांची तोडफोड करण्यात आल्यामुळे काही काळ व्यापारांच्या दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
एलबीटीला विरोध करण्यासाठी बंद कायम ठेवत एलबीटी विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज शहरातील विविध भागातील व्यापारी संघटनांच्या बैठका आयोजित करून त्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. गेल्या काही दिवसात व्यापारांच्या संघटनांमध्ये दोन प्रवाह असल्यामुळे शहरातील काही भागात दुकाने सुरू असतात तर मुख्य बाजारपेठ असलेला इतवारी, गांधीबाग, सराफा बाजार पूर्ण बंद राहत आहे. सीताबर्डीमधील कमी अधिक प्रमाणात दुकाने बंद असतात त्यामुळे आज संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागात जाऊन विविध  व्यापारी संघटनाच्या पदधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू भागात गीतांजली टॉकीज आणि पाचपावली भागातील व्यापारांनी टायर जाळून रस्ता रोको आंदोलन केले. सक्करदरा, नंदनवन, मेडिकल जगनाडे चौक या भागातील दुकाने दुपारच्या वेळी सुरू असताना ती बंद करण्यात आली. इतवारीत किराणा ओळ, धान्य बाजार, हार्डवेअर असोसिएशनचे पदाधिकारी बंद कायम ठेवत आंदोलनात सहभागी झाले होते.
सराफा असोसिएशनने आजपासून प्रतिष्ठाने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता मात्र, सकाळी संघर्ष समितीचे अध्यक्ष रमेश मंत्री आणि सराफा असोसिएशनचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत एकमताने सराफा व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सराफा बाजार पूर्ण बंद होता. सराफा व्यापारांमध्ये दोन गट पडले असून एका गटाने बंदला विरोध करून लग्नसराईचे दिवस असल्यामुळे चार-पाच दिवस दुकाने सुरू ठेवण्याचा आग्रह धरला मात्र त्यांना विरोध करण्यात आला. इतवारीतील सराफा बाजार सोडून शहरातील विविध भागातील सराफा दुकाने काही प्रमाणात मात्र सुरू होती. सायंकाळी चेंबरच्या कार्यालयात बैठक आयोजित करून त्यात आंदोलनाची पुढची ठरविली जाणार आहे.
दरम्यान आंदोलनाबाबत बोलताना संघर्ष समिताीचे अध्यत्र रमेश मंत्री यांनी सांगितले, एलबीटीवर सुरू असलेल्या व्यापारी बंदला मुंबईला चांहला प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री एलबीटी लागू करण्यावर ठाम असल्यामुळे व्यापारांचे आंदोलन सुरू राहणार आहे. शहरातील विविध भागातील मुख्य बाजारपेठासहीत चिल्लर विक्रेत्यांनी काही प्रणाणात दुकाने बंद ठेवली होती. व्यापारी कुठल्याही हिंसक प्रवत्तीने दुकाने बंद करीत नाही. सरकारच्या विरोधात चौकाचौकात निर्दशने केली जात आहे. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स आणि एलबीटी संघर्ष विरोधी समितीच्या पदधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.