गंगाखेड तालुक्यातील झोला िपप्री येथे आंबेडकर जयंती मिरवणुकीवर झालेल्या हल्ल्यात मयत झालेल्या उमाबाई कांबळे यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करून गंगाखेड शहरात जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी गंगाखेडमध्ये गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.
सोमवारी झालेल्या मारहाणीत उमा कांबळे या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूस उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. ब्याळे हेच जबाबदार आहेत, असा आरोप विविध दलित संघटनांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केला आहे. कांबळे कुटुंबास २५ लाखांची मदत द्यावी, त्यांच्या घरातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. दलित संघटनांनी पुकारलेल्या ‘बंद’ला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व बाजारपेठ बंद होती. रस्त्यावर दिवसभर शुकशुकाट होता. ‘बंद’च्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. शहराला छावणीचे स्वरूप आले होते. दलित संघटनेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर सुधाकर साळवे, धम्मानंद घोबाळे, रोहिदास लांडगे, मनोहर ब्यॉळे, प्रमोद मस्के आदींच्या सह्य़ा आहेत.