जिल्हय़ात गणेशोत्सवकाळात कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. महोत्सवकाळात सर्वत्र चोख बंदोबस्त लावला असून, नागरिकांनी शांतता राखून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी केले.
जिल्हय़ात ९ ते १८ सप्टेंबरच्या काळातील पोलीस बंदोबस्त व गणेशोत्सवादरम्यान करावयाच्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा पोलीस मुख्यालयात रविवारी पत्रकारांची बैठक घेण्यात आली. ७५५ पोलीस कर्मचारी (पुरुष), ७८ महिला पोलीस, एसआरपीएफ एक कंपनी, ३०० गृहरक्षक जवान, ५८७ ग्रामरक्षक बल, ३ चिडीमार पथक, ५५ पोलीस अधिकारी, ८३३ पोलीस कर्मचारी नेमण्यात आल्याचे दाभाडे यांनी सांगितले.
या वेळी पोलीस नियंत्रण कक्ष, अतिमहत्त्वाची ठिकाणे, विसर्जनाच्या दिवशीचा बंदोबस्त, शांतता समित्या, एक खिडकी योजना, आदर्श आचारसंहिता, विसर्जनाचा मार्ग तसेच गणोशोत्सवनिमित्ताने प्रतिबंधक कारवायांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. १० पोलीस ठाण्यांतर्गत ३१ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.