कल्याण, डोंबिवली परिसरात वाहतूक नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे येथील रहिवाशी एकीकडे हैराण झाले असतानाच गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिसांचा खडा पहारा सुरू झाल्याचे सकारात्मक चित्र दिसू लागले आहे. वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार प्रमुख चौकांमध्ये पोलिसांचा पहारा असलाच पाहिजे, असा आग्रह धरण्यात आला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील मरगळलेल्या वाहतूक व्यवस्थेला अचानक शिस्त आली असून येथील रहिवाशी या बदलाचे स्वागत करू लागले आहेत.
वाहतूक कोंडीचे आगार ठरलेल्या भिवंडीतील वाहतुकीला शिस्त लावण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडे ठाणे वाहतूक शाखेचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यांनी काढलेल्या सूचनांनुसार कल्याण डोंबिवलीतील प्रमुख चौक तसेच रस्त्यांवर वाहतूक पोलिसांची गस्त गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. वाहतूक पोलिसांच्या खडय़ा पहारामुळे कल्याणमधील शिवाजी चौक मार्गे होणारी वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. यापूर्वी कल्याण शिळफाटा रस्त्यावरील टाटा पॉवर, प्रीमिअर कॉलनी, काटई नाका, नांदिवली पूल, घारिवली वळण रस्ता परिसरांत वाहतूक पोलीस मोठय़ा संख्येने उभे असल्याचे चित्र होते. गेल्या काही दिवसांपासून इतर ठिकाणही पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.