विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिल्याने रुग्णांचे हाल झाले. डॉक्टरच उपस्थित नसल्याने रुग्णांवर उपचार होऊ शकले नाहीत. अनेक रुग्ण उपचाराविनाच रुग्णालयातून परत गेले तर काहींनी खासगी रुग्णालयाची वाट धरली. या संपावर तोडगा म्हणून प्रशासनाने थातूरमातूर प्रयत्न केले. परंतु हे प्रयत्न अत्यंत तोकडे पडल्याचे दिसून आले.
सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील निवासी डॉक्टर प्रशांत पवार यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करून त्यांना अटक करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी गुरुवारपासून संप पुकारला आहे. या संपाची दखल म्हणून, राज्य शासनाने डॉक्टरला मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांच्यासह तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. परंतु या डॉक्टरांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत हा संप सुरुच राहणार असल्याची माहिती मेडिकलमधील मार्डचे सहसचिव डॉ. जुनेद शेख आणि मेयोतील मार्डचे सहसचिव डॉ. विनायक डोंगरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
दरम्यान, या संपामुळे मेडिकल आणि मेयोतील रुग्णांचे चांगलेच हाल झाले. या दोन्ही रुग्णालयात नेहमीपेक्षा आज कमी रुग्ण आले. आवश्यक त्याच शस्त्रक्रिया करण्यात आल्यात. वार्डातील सर्व जबाबदारी नर्सेसच सांभाळत असल्याचे दिसून आले. आकस्मिक विभागात सकाळी काही डॉक्टर उपस्थित होते. दुपारनंतर मात्र येथे शुकशुकाट होता. त्यामुळे रुग्ण आल्यापावली परत गेले तर काही रुग्णांची खासगी रुग्णालयाची वाट धरली. मेडिकल व मेयोतील आयसीयूमध्येही डॉक्टरांची उपस्थिती अत्यल्प दिसून आली. या दोन्ही रुग्णालयात प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स बोलावण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या प्राध्यापकांनाही बोलावण्यात आले होते. परंतु रुग्णसेवा हाताळण्याचा त्यांना फारसा अनुभव नसल्याने त्यांच्या असण्याच्या फारसा लाभ झाला नाही.
मेडिकलमधील बाह्यरुग्ण विभागामध्ये गुरुवारी एकूण २०५७ रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यात आज घट झाली. आज फक्त १६६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
अनेक वार्डातील बेडसुद्धा रिकामे आहेत. १४०१ रुग्णांची क्षमता असलेल्या मेडिकलमध्ये फक्त ९६७ रुग्ण भरती आहेत. अन्य दिवशी मात्र ही संख्या एक हजाराच्या वर असते. या संख्येवरून संपाचा फटका बसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. अशीच स्थिती मेयो रुग्णालयाची आहे. दरम्यान, हा संप असाच लांबला तर मेडिकल आणि मेयोतील आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडून जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.