राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी मंगळवारी झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे येत्या दि. १३ पासून पुकारण्यात आलेला बेमुदत संप आता अटळ आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष योगिराज खोंडे यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात खोंडे यांनी म्हटले आहे, की मंगळवारी मुंबईत संघटनेची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली. मात्र संघटनेची एकही आर्थिक मागणी त्यांनी मान्य केली नाही. राज्य सरकारच्या महसुलात वाढ होईल असे प्रस्तावही संघटनेने त्यांना सादर केले, मात्र तेही त्यांनी नाकारले. यातील प्रत्येक मुद्दय़ावर मंत्रिमंडळाची टिप्पणी तयार करून नंतरच निर्णय घेण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
सहाव्या वेतन आयोगाने आठ वर्षांपूर्वी मंजूर केलेला वाहतूकभत्ता देण्यासही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी नकार दिला आहे. याशिवाय पाच दिवसांचा आठवडा, अत्युत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढ व संघटनेच्या अन्य मागण्याही त्यांनी नाकारल्या आहेत. त्यांचा हा नकारात्मक दृष्टिकोन लक्षात घेता संघटनेला आता तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नाही, त्यामुळेच येत्या दि. १३पासून जाहीर करण्यात आलेला बेमुदत संप अटळ आहे, असा इशारा खोंडे यांनी या निवेदनात दिला आहे.