लाखनी (मुरमाडी) तीन अल्पवयीन बहिणींवरील बलात्कार व अमानुष हत्याकांड, पोलिसांच्या बेपर्वाईच्या निषेधार्थ आणि आरोपींना त्वरित अटक व्हावी, या मागणीसाठी भाजपने दिलेल्या भंडारा आणि गोंदिया ‘जिल्हा बंद’च्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोंदिया-भंडाऱ्यात आज चित्रपटगृहे, सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, तसेच शाळा-महाविद्यालये बंद होती. या घटनेचे गांभीर्य पाहता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी पीडित बोरकर कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
गोंदिया भाजप महिला मोर्चाने या हत्याकांडाचा निषेध नोंदवित जिल्हाधिकारी अमित सनी यांना निवेदन दिले. आहे. या हत्याकांडातील तपासात लाखनी पोलिसांनी दिरंगाई केल्याने नराधमांना पसार होण्यात मदत झाली. अशा पोलीस अधिकाऱ्याला कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच निरपराध मुलींचा बळी घेणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीच्या आरोपींना त्वरित अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष रचना गहाणे, सभापती सविता पुराम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. गोंदियातही बंद पाळण्यात आला.
घटनेचे गांभीर्य आणि लोकांचा दबाब यामुळे आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या २० चमू तातडीने कामाला लावण्यात आल्या आहेत. आरोपींची माहिती देणाऱ्यांनी ०७१८४-२५२७८० आणि ९८५०६३५२५० या क्रमांकावर माहिती द्यावी. त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी जाहीर केले आहे.  लाखनीतील संतप्त लोकांनी आजही सकाळी १०.३० ते सायंकाळ पर्यंत राष्ट्रीय महामार्ग अडवून ठेवला. ठिकठिकाणी टायर पेटविण्यात आले होते.  आमदार नाना पटोले यांनी लाखनीच्या तहसील कार्यालयात सकाळी निवेदन दिले. त्यानंतर ते पोलीस ठाण्याकडे येताना त्यांना अडविण्यात आले. त्यानंतर त्यांनी दिवसभर लाखनीत ठिय्या दिला.